राज्यात होरपळ; उष्माघाताने दोघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:24 AM2019-05-30T06:24:01+5:302019-05-30T06:24:04+5:30
उष्णतेच्या लाटेने राज्याची होरपळ सुरूच असून, बुधवारी राज्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला आहे.
मुंबई /पुणे : उष्णतेच्या लाटेने राज्याची होरपळ सुरूच असून, बुधवारी राज्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला आहे. राज्यात सर्वाधिक ४८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली आहे.
किनगाव (ता़ अहमदपूर) येथील शेतकरी शिवाजी बंडाप्पा शेळके (६५) हे दुपारी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेतात गेले असताना चक्कर येऊ कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. वरोरा (जि. चंद्रपूर) येथे एक ५० वर्षीय अनोळखी महिला बसस्थानकावर मृतावस्थेत आढळून आली असून, शवविच्छेदन केले असता तिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे उघड झाले. विदर्भात येत्या २ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. देशाच्या दक्षिण व उत्तरेतील १५ राज्यांमध्येही सध्या उष्णतेची लाट आहे.