Join us

राज्य महामार्ग अतिक्रमणांच्या विळख्यात

By admin | Published: November 03, 2014 12:12 AM

कल्याण-बदलापूरमार्गे पुण्याला जोडणा-या राज्य महामार्गाचे काम अंबरनाथ शहरात सुरू आहे. चौपदरी रस्ता मंजूर असतानाही अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे हा रस्ता तीनपदरीच करण्यात आला आहे

अंबरनाथ : कल्याण-बदलापूरमार्गे पुण्याला जोडणा-या राज्य महामार्गाचे काम अंबरनाथ शहरात सुरू आहे. चौपदरी रस्ता मंजूर असतानाही अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे हा रस्ता तीनपदरीच करण्यात आला आहे. अस्तित्वातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याकडे एमएमआरडीए दुर्लक्ष करत असतानाच या रस्त्याच्या मार्गावरच नव्याने व्यापारी गाळे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाला खो बसला आहे. अंबरनाथ पालिकेचे अधिकारी एमएमआरडीएकडे बोट करून आपली जबाबदारी झटकत आहेत. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याच्या आड येणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात कोणताही रस दिसत नाही. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, कर्जतमार्गे पुण्याला जोडणाऱ्या राज्य महामार्गाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले आहे. १२९ कोटींच्या या रस्त्यासाठी एमएमआरडीएने निधीची तरतूदही केली. मात्र, कल्याण आणि उल्हासनगरमध्ये रुंदीकरणाअभावी हा रस्ता झाला नाही. अंबरनाथमध्ये साईबाबा मंदिर ते आयटीआयपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, अंबरनाथ शहरातील मटका चौक ते फॉरेस्ट नाक्यापर्यंतच्या रस्त्यालाही अतिक्रमणांमुळे खो बसला आहे. एक हजार ३०० हून अधिक अतिक्रमणे येत असल्याने या अतिक्रमणांवर एमएमआरडीमार्फत कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या वर्षभरात राजकीय हस्तक्षेपामुळे हा रस्ता आणि रस्त्याआड येणारी अतिक्रमणे काढण्यात एमएमआरडीएला अपयश आले आहे. मुळात हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र, या रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला. आता या रस्त्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. असे असूनही त्यांच्याकडून या कामात कसूर केली जात आहे. (प्रतिनिधी)