Join us

मुंबईसह राज्याला मिळणार मुबलक लसींचा साठा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 6:20 PM

corona vaccine : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पूर्ण देशभरात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडत असताना  महाराष्ट्र आणि मुंबईला सुद्धा आवश्यक लसींचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राजेश भूषण यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिले आहे.

मुंबई: कोरोना महामारीच्या रक्षणासाठी लसीकरण हे आज जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. देशातील इतर सर्व शहरां पेक्षा मुंबईचे क्षेत्र हे लोकसंख्येचे दृष्टीने मोठे आहे. मुंबई शहरात एका मनपा वॉर्ड ची लोकसंख्या सरासरी ९०००० हजारच्या आसपास असते. पण एका लसीकरण केंद्रावर प्रति दिवस शंभर ते दोनशे लसीकरण डोस उपलब्ध असतात. त्यामुळे मुंबईत डोसची कमतरता भासत आहे. 

मुंबईत ५०% लोक लसीकरणसाठी पात्र असतांना  त्या तुलनेत डोस उपलब्ध नसल्याने मुंबईकरांना जास्त लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचे सचिव  राजेश भूषण यांना २९ जुलैच्या पत्राद्वारे केली होती. 

मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कोविड-१९ च्या केसेस आहेत. त्यामुळे मुंबईचा प्रत्येक नागरीक लसीकरणाचे लाभार्थी व्हावे यासाठी  मुंबई शहराकडे विशेष लक्ष देऊन मुंबईला जास्त डोस डोस  वितरीत करण्यात यावे असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात नमूद केले होते. राजेश भूषण यांनी ८ सप्टेंबर रोजी त्यांना उत्तर पाठवले आहे. त्यात नमूद केले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात केंद्राकडून मोफत लस उपलब्ध करून देण्यात गरजे पेक्षा अधिकच दिले आहे. ऑगस्ट महिन्यात १,२६,९६,४१० लसीचे डोस महाराष्ट्र राज्यात पाठविण्यात आले. तसेच, खाजगी रुग्णालयात २०,१९,९४० लस खरेदी करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात निःशुल्क डोस १,७०,३८,१४० म्हणजेच ऑगस्ट पेक्षा १.४ लसींच्या मात्रा अधिक पाठविण्यात आले आहे. या पुढे ही लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पूर्ण देशभरात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडत असताना  महाराष्ट्र आणि मुंबईला सुद्धा आवश्यक लसींचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राजेश भूषण यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिले आहे.

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस