अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या मदतीस धावले राज्य विमा महामंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 01:34 AM2020-12-17T01:34:06+5:302020-12-17T01:34:12+5:30
११ डिसेंबर रोजी सत्यवान यांच्या पत्नी सावित्री सावंत यांना ५३ हजार ७२८ रुपयांचा धनादेश तसेच मुलगी नम्रता सावंत व मंगल सावंत आणि मुलगा समाधान सावंत यांना महाराष्ट्र राज्याचे ईएसआयसीचे अतिरिक्त आयुक्त व प्रादेशिक संचालक प्रणय सिन्हा यांच्या हस्ते प्रत्येकी ३५ हजार ८१९ रुपयांचा धनादेश देण्यात आला.
मुंबई : ईएसआय योजनेत सहभागी असणारे कर्मचारी सत्यवान सावंत यांचे मुंबईत एका अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्याचप्रमाणे पंकज शिरिषकर यांचेदेखील काही कारणामुळे निधन झाले होते. या दोन्ही व्यक्तींच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली होती. अशा वेळी राज्य विमा महामंडळ या कुटुंबीयांच्या मदतीला धावले. सावंत यांच्या कुटुंबामध्ये ते एकमेव कमविणारे व्यक्ती होते. मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु सावंत हे राज्य विमा महामंडळाचे विमाधारक लाभार्थी असल्याने ईएसआय अधिनियम १९४८नुसार त्यांचे कुटुंबीय योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरले.
११ डिसेंबर रोजी सत्यवान यांच्या पत्नी सावित्री सावंत यांना ५३ हजार ७२८ रुपयांचा धनादेश तसेच मुलगी नम्रता सावंत व मंगल सावंत आणि मुलगा समाधान सावंत यांना महाराष्ट्र राज्याचे ईएसआयसीचे अतिरिक्त आयुक्त व प्रादेशिक संचालक प्रणय सिन्हा यांच्या हस्ते प्रत्येकी ३५ हजार ८१९ रुपयांचा धनादेश देण्यात आला.
त्याचप्रमाणे पंकज शिरिषकर यांच्या कुटुंबीयांनाही ईएसआयसीने आर्थिक पाठबळ दिले. ईएसआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ईएसआय कायद्यातील तरतुदीनुसार शिरिषकर कुटुंबीयांना दरमहा योजनेचे फायदे मिळणार आहेत.
या कठीण काळात ईएसआय कॉर्पोरेशन दोन्ही कुटुंबीयांच्या मदतीला धावल्याने कुटुंबातील सदस्यांनी ईएसआयसीचे आभार व्यक्त केले. यावेळी जनसंपर्क व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक आलोक गुप्ता, लोअर परळ शाखेचे व्यवस्थापक राहुलसिंह परदेशी, घाटकोपर शाखेचे व्यवस्थापक चांदणे उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी ईएसआय योजने अंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांविषयी माहिती देत नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.