राज्य विमा कामगार रुग्णालयाचा संप अखेर मिटला
By admin | Published: June 30, 2017 03:14 AM2017-06-30T03:14:33+5:302017-06-30T03:14:33+5:30
अंधेरी पूर्व एमआयडीसी सीप्झ येथील राज्य विमा निगम कामगार रुग्णालयात गेले दहा दिवस सुरू असलेला संप गुरुवारी सायंकाळी अखेर मिटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पूर्व एमआयडीसी सीप्झ येथील राज्य विमा निगम कामगार रुग्णालयात गेले दहा दिवस सुरू असलेला संप
गुरुवारी सायंकाळी अखेर मिटला. येथील वैद्यकीय अधीक्षक आभा जैन आणि ईएसआयएस नर्सेस असोसिएशन यांच्यामध्ये दुपारी ४ वाजता सुरू झालेली बैठक सकारात्मक चर्चेअंती सायंकाळी ७ वाजता संपली.
येथील युनियनचे उपाध्यक्ष कैलास धायल यांची युनियनला विश्वासात न घेता औरंगाबाद येथे बदली केल्यामुळे युनियनने संपाचे हत्यार दहा दिवसांपूर्वी उपसले होते. येथील १३० नर्सेस संपावर गेल्यामुळे राज्याच्या विविध औद्योगिक आस्थापनातून येथे दाखल होत असलेल्या रुग्णांचे हाल झाले होते. गुरुवारच्या बैठकीत यापुढे येथील कर्मचारी वर्गाची बदली करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येईल. तसेच जे कर्मचारी ईएसआयएसच्या राज्यातील दुसऱ्या आस्थापनात स्वखुशीने जाण्यास तयार असतील; त्यांना बदलीत प्राधान्य देण्यात येईल. कैलास धायल यांच्या बदलीबाबतीत त्यांना फक्त दोन महिन्यांकरिता औरंगाबाद येथे पाठवण्यात येईल, असे व्यवस्थापनाने लेखी दिले आहे.