निवडणूक आयोगासमोरील लढाईआधीच CM शिंदेंची मोठी खेळी, शिवसेनेच्या ८ राज्यप्रमुखांचा शिंदे गटाला पाठिंबा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:09 AM2022-09-15T11:09:00+5:302022-09-15T11:10:54+5:30
शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर होणार असताना याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.
मुंबई-
शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर होणार असताना याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्रातील नेते आणि आमदारांपाठोपाठ आता इतर राज्यातील शिवसेनेच्या राज्य प्रमुखांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी शिंदे गटाची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राबाहेरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यात जवळपास ८ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे.
दिल्ली, छत्तीसगड, मणीपूर, गोवा, बिहार यासह इतर राज्यांचे शिवसेनेचे राज्य प्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानं उद्धव ठाकरे गटाचं टेन्शन आता वाढण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्हं धनुष्यबाण आपल्याला द्यावं अशी मागणीदेखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी यासह इतर मुद्यांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर सुप्रीम कोर्टात २९ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.