कोरोनामुक्त गाव उपक्रमाची केली घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत थोडी वाढ पाहायला मिळत आहे. सध्याचा लाॅकडाऊन पंधरा दिवसांसाठी वाढविण्यात आला आहेच. मात्र, आता कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन काही ठिकाणी निर्बंध अधिक कडक करण्याचा किंवा सवलती देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना दिली.
समाज माध्यमांद्वारे नागरिकांना संबोधित करताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. गेल्या महिनाभरात नक्कीच फरक पडला आहे, पण सध्या असलेली संसर्गाची आकडेवारी गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेतील उच्चांकी संख्येइतकीच आहे. अजूनही रुग्णसंख्या म्हणावी तितकी खाली गेलेली नाही. काही जिल्ह्यांत विशेषतः ग्रामीण भागांत रुग्णसंख्या थोडीशी वाढत असल्याचे चित्र आहे. त्याला तातडीने थोपवावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना कमी झाले की उघडा, वाढले की बंद करा, असले चावीवाल्याचे काम करायचे नाही. लाॅकडाऊन लावणे हे आवडीचे काम नाही, पण नाईलाज आहे. आताही संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हळुवारपणे निर्बंध उघडावे लागतील, शिवाय तिसरी लाट येऊच नये, यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी काही बाबी जाणीवपूर्वक करावे लागतील. मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे या त्रिसूत्रीसोबतच कोरोनामुक्त घर, कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवावी लागेल. राज्यातील तीन सरपंचांनी आपली गावे कोरोनामुक्त करून दाखविली आहेत, तसेच काम आपल्याला प्रत्येक गावात करायचे आहे. कोरोनामुक्त गाव उपक्रमाने आपण कोरोनाची तिसरी लाट नक्कीच थोपवू, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
अनाथ बालकांचे पालकत्व घेणार
दुसरी लाट अपेक्षेपेक्षा मोठी होती. विचित्र आणि वाईट साथ होती. यात अनेकांनी बालकांनी आपले पालक गमावले. अनाथ बालकांसाठी केंद्र सरकारने योजना जाहीर केली आहे. राज्य सरकारही अनाथांसाठी योजना आखत आहे. राज्य अनाथांची जबाबदारी घेईल. त्यांचे पालकत्व घेऊन त्यांना शिक्षणासाठी साथ देईल. त्यासाठी योजना तयार करून, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रस्त्यावर उतरून कोरोना दूत बनू नका
कोरोनाची स्थिती काहीशी नियंत्रणात आल्यावर आता काही जण हे उघडा ते उघडा म्हणून कुरबुर करतील. हे नाही केले, ते नाही केले, तर रस्त्यावर उतरू, अशी भाषा करतील. कोरोना बिरोना बघणार नाही म्हणतील, पण रस्त्यावरून उतरून कोरोनाचे निमंत्रक बनू नका. उतरायचेच असेल, तर कोरोना योद्धे म्हणून उतरा, कोरोना दूत म्हणून उतरू नका. रस्त्यावर उतरणे म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रक होणे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लसीकरण
राज्यातील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च एकरकमी उचलण्याची तयारी आहे. मात्र, देशातील लस उत्पादनाला मर्यादा आहेत. जून महिन्यापासून पुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जशा लसी येतील, तसे वेगाने लसीकरण करण्यात येईल. लवकरच १८ ते ४४ जोमाने लसीकरण सुरू केले जाईल.
शिक्षणासाठी क्रांतिकारक निर्णय घ्यावे लागतील
दहावीच्या परीक्षा रद्द करून नवीन मूल्यांकन धोरण जाहीर केले आहे. तसाच निर्णय बारावीसंदर्भात घ्यावा लागेल. त्याची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारनेही याबाबत धोरण ठरवावे लागेल. शैक्षणिक धोरण देशभर एकच असायला हवे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास पंतप्रधानांना पत्र पाठवून, बोलणे करेन. शिक्षणासाठी क्रांतिकारक निर्णय घ्यावे लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मदतीचे निकष बदलण्याची गरज
तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राला स्पर्शून गेले, पण गुजरातवर धडकले. मी धावता दौरा केला असला, तरी वादळापूर्वी मिनिटा-मिनिटाचा आढावा घेत होतो. त्यावर लक्ष ठेवून होतो. स्पर्शून गेला असला, तरी व्हायचे ते नुकसान झालेच. त्यासाठी मदत देण्याचे काम सुरू आहे, पण आता केंद्राने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीसाठीचे निकष बदलण्याची गरज आहे, तसेच भूमिगत वीजवाहिन्या, पक्के निवारे, भूकंपविरोधी घरे याबाबत केंद्र सरकारशी बोलत आहोत. याबाबत ते मदत करतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.