ऑक्सिजननिर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने गायब केला -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:06 AM2021-04-26T04:06:43+5:302021-04-26T04:06:43+5:30
ऑक्सिजननिर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने गायब केला भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचा आघाडी सरकारवर आरोप लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
ऑक्सिजननिर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने गायब केला
भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचा आघाडी सरकारवर आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र, आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभे केले असते, तर राज्यात ऑक्सिजनअभावी अनेकांचा बळी गेला नसता. केंद्र सरकारने ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले, याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी केली.
प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाबाबत महाविकास आघाडी सरकारवर थेट हल्लाबोल केला. ऑक्सिजनबाबत प्रत्येक राज्य स्वयंपूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने जानेवारी २०२१ मध्ये राज्य सरकारांना पत्रे पाठविली होती. त्यानुसार ‘पीएम केअर’ निधीतून महाराष्ट्राला दहा ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, पाच महिन्यांत या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरू केला नाही. गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनअभावी अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. केंद्राने दिलेले अर्थसाहाय्य व मुख्यमंत्री निधीत पडून असलेला पैसा, यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभे राहिले असते. एका पोलीस अधिकाऱ्याकडून वसुली करणाऱ्या या सरकारने ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांसाठी दिलेला निधी ‘खाऊन’ टाकला, असा आरोप लाड यांनी केला. कोरोनाची दुसरी लाट भयावह असणार आहे, याची कल्पना असूनही या काळात अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठीही काहीही केले नसल्याचेही ते म्हणाले.
भाजप हा खोटारडा पक्ष -सचिन सावंत
भाजप हा जगातील सर्वांत मोठा खोटारडा पक्ष आहे. केंद्र सरकारने १० ऑक्सिजन प्रकल्पांकरिता राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्पाचे कार्यान्वयन करण्यासाठी एजन्सी मोदी सरकारनेच ठरवली. ५ एप्रिल २०२१ नंतर मशीन पुरवत आहेत. सिंधुदुर्गला अजून दिली नाही.
केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या एजन्सीचे इंजिनिअर इन्स्टॉलेशन करत आहेत. असे असतानाही पत्रकार परिषद घेऊन खोटारडे आरोप भाजपा करत आहे. देशात घोषित केलेल्या १६२ ऑक्सिजन प्रकल्पांपैकी केवळ ३३ झाले, असे केंद्र म्हणत आहे. आता ५५१ नवीन जाहीर केले. ते चालू होणार केव्हा हे मोदीजीच जाणोत, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले.