Join us

राज्य मराठी विकास संस्थेला ‘पूर्ण वेळ’ संचालक मिळेना

By admin | Published: October 24, 2016 4:35 AM

राज्य मराठी विकास संस्थेला गेल्या अनेक वर्षांपासून संचालक नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या संस्थेला ‘पूर्ण वेळ संचालक’ या पदासाठी जानेवारी २०१० पासून

मुंबई : राज्य मराठी विकास संस्थेला गेल्या अनेक वर्षांपासून संचालक नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या संस्थेला ‘पूर्ण वेळ संचालक’ या पदासाठी जानेवारी २०१० पासून, तर ‘पूर्ण वेळ उपसंचालक’ या पदासाठी मे २००९ पासून भरती झालेली नाही. राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदाच्या शिफारशींची पत्रे मराठी भाषा विभागातून हरवली आहेत. मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर, एफआयआर दाखल करण्याचे मुख्य माहिती आयुक्तांनी आदेश दिले आहेत. निवड समितीच्या तीनही सदस्यांनी शिक्षणमंत्र्यांना बंद लिफाफ्यातून नावांची शिफारस असलेली पत्रे पाठवली. मात्र, ही पत्रे माहिती अधिकारात मागितली असता, ती मराठी भाषा विभाग कार्यालयातून गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती भंडारेंना मिळाली.राज्य मराठी विकास संस्थेने लेखी विनंती करूनही शिक्षणमंत्री विनोद तावडे कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी राजेंद्र गोळे यांनी माहिती न दिल्यामुळे, त्यांच्यावर माहितीचा अधिकार कलम ३(३)च्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. राजेंद्र गोळेंची बदली झालेली असल्याने, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे विशेष कार्य अधिकारी विकास नाईक हे दुसऱ्या सुनावणीला उपस्थित राहिले.त्या सुनावणीत निवड समिती सदस्यांची पत्रे गहाळ झाल्याची कबुली मराठी भाषा विभागाकडून देण्यात आली. तेव्हा ती पत्रे लवकरात लवकर शोधून, एका महिन्याच्या कालावधीत अर्जदारांना द्यावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)