मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे स्थीर असून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते. मात्र, दुसरीकडे मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत विरोधकांकडून सातत्याने देण्यात येत आहेत. आता, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा मध्यावधींचे वेध लागले आहेत. तर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दावनेंच्या विधानावरुन, हे सरकार १०० टक्के पडणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे, एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार आणि दुसरीकडे मध्यावधींची चर्चा रंगली आहे.
राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्यापासून महाविकास आघाडीतील लहानमोठे अनेक नेते मध्यावधी निवडणुका लागण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी तोच सूर आळवला. जानेवारी महिन्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. आता, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजप सेनेची युती तुटली, गेल्या २.५ वर्षांत चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं कुणालाही वाटत नव्हतं. पण, अशी जादू झाली की एक रात्रीत सरकार गेलं. आता, असंच राजकारण चाललं तर आणखी दोन महिन्यांनी काय होणारय, याचा कोणी अंदाज लावला का? असे केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणुका घ्या असं विधान केलंय. पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत असं म्हटलं होतं.
दानवेंच्या विधानावर संजय राऊत म्हणतात...
रावसाहेब दानवे आमचे चांगले मित्र आहेत, त्यांची स्लीप ऑफ टंग होऊन ते खरं बोललेले आहेत. दोन महिन्यांनी वेगळं चित्र असेल म्हणजे मध्यावधीची घोषणा होऊ शकते. किंवा हे सरकार पडू शकतं, याचे संकेत रावसाहेब दानवेंनी दिले आहेत. हे सरकार १०० टक्के पडू शकतं, अशी माझ्याकडे पूर्णपणे माहिती व खात्री आहे, असेही ते म्हणाले.