"तुम्ही ज्या तख्तावर बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील"
By मुकेश चव्हाण | Published: December 6, 2020 05:20 PM2020-12-06T17:20:43+5:302020-12-06T17:21:09+5:30
राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई/ जळगाव: केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ११ वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीचा विचार न करता पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरीदिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक नसल्याचं दिसून येतंय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Delhi: Farmers continue to hold a sit-in protest at Singhu (Haryana-Delhi border) against the Centre's #FarmLaws. pic.twitter.com/774cbrGtlK
— ANI (@ANI) December 6, 2020
गुलाबराव पाटील माध्यामांशी संवाद साधताना म्हणाले की, शेतकऱ्यांवर अन्याय करू नका. अन्यथा दिल्ली दूर नाही. तुमचे तीनच वर्षे उरले आहेत. ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच शेतकरी या देशाचा कणा आहे. जर शेतकरी जगला तरच हा देश जगेल. भारत देश केवळ कृषीप्रधान आहे असं म्हणून चालणार नाही तर त्यासाठी शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे लागतील, असं गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, शेतकरी आंदोलनाबाबतीत केंद्र सरकारने आडमूठेपणा न दाखवता आता शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही, असा इशारा देखील शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. या राज्यातील शेतकऱ्यांकडून पिकवला जाणारा गहू आणि तांदूळ केवळ देशातच नाही तर इतर १७ ते १८ देशांना निर्यात केला जातो. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी", असं शरद पवार यांनी सांगितले.
९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुढील बैठक
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. शनिवारी शेतकरी आणि सरकारमध्ये झालेली चर्चा देखील निष्फळ ठरली. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केलं आहे. त्याआधी ८ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
ब्रिटनच्या 36 खासदारांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. त्यास ब्रिटनच्या 36 खासदारांनीही पाठिंबा दिला आहे. ब्रिटिश सरकारने नरेंद्र मोदी सरकारसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासंदर्भात पत्रही लिहिले आहे. लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंग धेसी यांच्या नेतृत्वाखाली 36 ब्रिटिश खासदारांनी युकेचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे.