शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:02 IST2017-11-25T20:00:32+5:302017-11-25T20:02:25+5:30
26 नोव्हेंबर 2008साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची बाजी लावून दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणा-या शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी शनिवारी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतली भेट
मुंबई दि. 25 - 26 नोव्हेंबर 2008साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची बाजी लावून दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणा-या शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी शनिवारी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
वरळी पोलीस कॅम्पमध्ये ओंबळे यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून सुविधा वेळेवर पुरविल्या जातात की नाही, तसेच काही अडी-अडचणी आहेत का याबद्दल विचारणा केली. तसेच त्यांना प्रशासनाच्या सहाय्याने आवश्यक ती मदत करणार असल्याची ग्वाहीदेखील पाटील यांनी दिली.
रविवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2017 रोजी या दहशतवादी हल्ल्याला 9 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे शहिद तुकाराम ओंबळे यांच्या मुंबईतील स्मारकासही पाटील यांनी भेट दिली. सद्यस्थितीत मुंबई शहरात सुरक्षेसंदर्भातील सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस, एटीएस मुख्यालय, जी.टी.रूग्णालयाजवळील परिसर, लिओपार्ड कॅफे आदी ठिकाणांना भेट दिली.
मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस दल दिवसरात्र तैनात असतात. आपात्कालीन परिस्थिती किंवा दहशतवाद हल्ला अशा घटनेनंतरही मुंबई पुन्हा नव्याने कार्यरत असते ही बाब कौतुकास्पद आणि स्फूर्ती देणारी आहे असेही पाटील यावेळी म्हणाले. शहीद ओंबळे आणि त्यांच्यासह शहीद झालेल्या सर्वच पोलीस दलातील शहिदांचा आम्हाला अभिमान आहे. शासनाला त्यांच्या बलिदानाची आजही आठवण आहे. त्यांचे बलिदान कायम सर्वांच्या अविस्मरणीय आहे. यासाठी देश कायम ऋणी राहील, त्यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.