Video: विस्कळीत रेल्वेसेवेचा सर्वसामान्यांसोबत मंत्र्यांनाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:17 PM2019-07-01T14:17:41+5:302019-07-01T14:18:32+5:30
विधानसभा अधिवेशनाला लवकर जायचं यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथून ट्रेन पकडली. मात्र मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
मुंबई - रात्रीपासून मुंबईत पडणाऱ्या पावसाने मुंबईकर चाकरमान्यांची दैना केली. सायन-माटुंगा येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक रखडली तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेही उशिराने धावत होत्या. चाकरमान्यांसोबत विस्कळीत रेल्वेसेवेचा फटका राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही बसला. जवळपास 2 तास त्यांना लोकलमध्ये ताटकळत उभे राहावे लागले
विधानसभा अधिवेशनाला लवकर जायचं यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथून ट्रेन पकडली. मात्र मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या रखडत रखडत सुरु होत्या. सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान पाणी रुळांवर साचल्याने धीम्यागतीने रेल्वे वाहतूक सुरु होती.
In view of heavy rains & high tide in & around Mumbai, Minister of Railways Shri Piyush Goyal is keeping close watch, specially on services & arrangements for safety of commuters, etc. He is in constant touch with the senior railway officials.
— Central Railway (@Central_Railway) July 1, 2019
मुसळधार पाऊस आणि हाईटाईडमुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल हेदेखील मुंबईच्या रेल्वे सेवेवर नजर ठेऊन आहेत. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधांच्या बाबतीत मंत्री रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेऊन आहेत. मागील 24 तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द झाल्या आहेत.
तसेच रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून रेल्वे परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे. रुळावर साचलेल्या पाण्याचा निचरा करुन वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक 40-45 मिनिटे उशिराने सुरु होती. तर हार्बर रेल्वे 15-20 मिनिटे उशिराने धावत होती.
मध्य रेल्वेवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल कुर्ला स्थानकात रखडल्या होत्या. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स स्टेशनजवळ सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने मरीन लाईन्स-चर्चगेट वाहतूक ठप्प झाली होती. हार्बर रेल्वेवर मानखुर्द-चुनाभट्टीजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने त्याचा परिणामही हार्बर रेल्वेवर झाला होता.
गुजरात,डहाणूवरून मुंबई कडे जाणारी फ्लाईग राणी एक्सप्रेस (8.25 वाजता), वलसाड फास्ट पॅसेंजर(7.10) दिवा-वसई मेमो(8), डहाणू-पनवेल मेमो(6.02), डहाणू-अंधेरी लोकल(5.16), सुरत-विरार शटल(9.31) या गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच चर्चगेट वरून डहाणू कडे जाणाऱ्या चर्चगेट डहाणू(6.48 वाजता)(7.26 वाजता),विरार डहाणू(6.08) आदी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने पालघर तसेच वलसाडला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
पाहा व्हिडीओ -