पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा 'कडक' लॉकडाऊन गरजेचा, कॅबिनेटमध्ये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 03:42 PM2021-04-20T15:42:45+5:302021-04-20T15:43:17+5:30
राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी लोकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भातही राजेंद्र शिंगणे यांनी सकारत्मकता दर्शवली आहे.
मुंबई - राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुन्हा एकदा लॉकडाऊन बाबत मोठे विधान केले आहे. राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत. कडक निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसून रुग्णसंख्या वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीर राज्य सरकार आज कडक लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात 15 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे म्हटले आहे.
लॉकडाऊनसंदर्भात सरकार पुढचे पाऊल टाकण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान केले. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. आता, मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही लॉकडाऊनचे थेट संकेत दिले आहेत.
राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी लोकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भातही राजेंद्र शिंगणे यांनी सकारत्मकता दर्शवली आहे. पूर्वीप्रमाणेच राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर केलेल्या चर्चेत म्हटलं. आरोग्य यंत्रणेंवर सर्वात मोठा ताण येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात यावा, अशी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यातील परिणाम पाहून पुन्हा पुढील लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घ्यावा. आजच्या कॅबिनेट बैठकीत निश्चितच यासंदर्भात चर्चा होईल. त्यामुळे, निश्चितच काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल, असेही शिंगणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, राज्यातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे.