राज्यात दिवसाला ४० ते ५० हजार रेमडेसिविरची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:13+5:302021-04-13T04:06:13+5:30
आरोग्य विभाग; एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दररोज ५० हजार रेमडेसिविरची ...
आरोग्य विभाग; एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दररोज ५० हजार रेमडेसिविरची गरज असून, तेवढ्या इंजेक्शनचा पुरवठा होत आहे, तर मुंबईत सध्या ३६ हजारांहून अधिक रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने दिली आहे. मागील वर्षी राज्यात दररोज ३० हजार व्हायल्स लागत होत्या, सध्या हे प्रमाण ४० ते ५० हजार व्हायल्सवर आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे. टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, सध्याची काेराेनाची वाढती रुग्णसंख्या पाहता एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करण्याचे सुचविले आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देऊ नये, त्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काळाबाजार रोखण्यासाठी हे इंजेक्शन रुग्णालय प्रशासनाकडून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कुठेही १,४०० रुपये या किमतीतच रेमडेसिविर मिळाले पाहिजे, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रेमडेसिविरचे उत्पादन १५ दिवसांत दुप्पट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
* उत्पादन वाढविण्याचे निर्देश
मागील काही काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने कंपन्यांना उत्पादन कमी करण्याचे निर्देश दिले होते. आता अचानक कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उत्पादकांशी चर्चा करून त्वरित उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे. सध्या एकूण उत्पादनापैकी ७० टक्के पुरवठा राज्याला, तर उर्वरित ३० टक्के अन्य राज्यांना करण्यात येत आहे.
- बी. मंत्री,
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
* ...तर तक्रार नोंदवा!
डॉक्टरांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णास रेमडेसिविर प्रिस्क्राईब करावे. रेमडेसिविरची गरज भासल्यास अन्न औषध प्रशासनाच्या राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. काळाबाजार करणाऱ्यांची माहिती १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले.
* इंजेक्शन मिळविणे झाले अवघड
इंजेक्शन खरेदीसाठी आधारकार्ड, प्रिस्क्रिप्शन सक्तीचे केल्याने हे इंजेक्शन मिळविताना नाकीनऊ येत आहेत. काेरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेमडिसिविरची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही औषध विक्रेत्यांनी इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केला आहे. गरजू रुग्णांना स्वस्त दरात ते उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा आहे.
- वंदना आशापुरा, रुग्णाचे कुटुंबीय
* प्रिस्क्रिप्शन न देता इंजेक्शनची मागणी
मुलुंड येथील खासगी रुग्णालयाने प्रिस्किप्शन न देता रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितले. मात्र, कुणीच इंजेक्शन दिले नाही. एफडीएच्या नियंत्रण कक्षाने प्रिस्क्रिप्शनची सक्ती केल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने चिठ्ठी लिहून दिली. या सर्व गाेंधळात आठ तासांनंतर इंजेक्शन मिळाले.
- दयावंत भोसकर, रुग्णाचे नातेवाईक
..........................