Join us

राज्यात दररोज ९८० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:06 AM

डॅशबोर्ड तयार करणार; १०० टक्के उत्पादन वैद्यकीय कारणांसाठीच आरक्षितलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात सध्या १२०० मेट्रिक टनपैकी ...

डॅशबोर्ड तयार करणार; १०० टक्के उत्पादन वैद्यकीय कारणांसाठीच आरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सध्या १२०० मेट्रिक टनपैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून, काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा तुटवडा काही भागांमध्ये जाणवू लागल्याची तक्रार केली जात आहे. काेरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या समन्वयाने हवाई वाहतुकीद्वारेही ऑक्सिजन पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडून वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्यातील ऑक्सिजनचे १०० टक्के उत्पादन हे फक्त वैद्यकीय कारणांसाठी आरक्षित ठेवले आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आदी अत्यावश्यक साधनसामग्रीच्या माहितीसाठी राज्याचा स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करावा, जेणेकरून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना या डॅशबोर्डच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यानुसार रुग्णसंख्येप्रमाणे नियोजन करून सुलभता निर्माण होईल, अशी माहिती आराेग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत रुग्णाला ३० ते ४० लिटर ऑक्सिजन मिनिटाला लागत होता. मात्र, आता याचे प्रमाण मिनिटाला ८५ लिटरवर आले आहे. राज्यात एकूण रुग्णसंख्येपैकी दहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. मध्यप्रदेशमधून पुरवठा सुरू झाला आहे. गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमधूनही ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. व्यास यांनी दिली.

* ग्रामीण भागात स्थिती बिकट

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील जिल्ह्यांमधील छोटी रुग्णालये, कोविड केंद्र आणि नर्सिंग होमच्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती अधिक बिकट आहे. नाशिक, सोलापूर, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, नागपूर, जळगाव या जिल्ह्यांत ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनची गुणवत्ता आणि प्रमाण याचा ताळमेळ नसल्यामुळे ऑक्सिजनच्या वितरणावर याचा परिणाम होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा आलेख वाढत राहिला, तर परिस्थिती आणखी गंभीर बनेल, अशी स्थिती आहे.

* ७,००० मेट्रिक टन ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता

राज्यात एकूण ६५ ऑक्सिजन भरणा केंद्रे असून, राज्यात ऑक्सिजन साठवणूक करणाऱ्या विविध टँकची क्षमता ७,००० मेट्रिक टन साठवणुकीची आहे. आरोग्य विभागांतर्गत शासकीय व पालिका रुग्णालयात मिळून १,५०० मेट्रिक टन ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. मात्र, राज्यातील विविध कंपन्यांची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १,२०० मेट्रिक टन व रोजचा वापर ९८० मेट्रिक टन वापर लक्षात घेता आता अन्य राज्यांकडून ऑक्सिजन पुरवठा मिळणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

*...तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा!

ऑक्सिजन पुरवठ्याविषयी तक्रार असल्यास प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष आहे, याचे नियंत्रण अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिविरविषयी समस्या आढळल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

.....................