लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिक्षणापासून वंचित व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच शिक्षणातील गळती व नापासांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालणार आहे. परंतू मुक्त विद्यालय मंडळाचा अभ्यासक्रम हा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असेल. प्रौढ व्यक्ती, गृहिणींनादेखील येथे शिक्षण घेता येईल. मंडळामार्फत कौशल्य संपादीत करुन स्वत:च्या व्यवसायात उपयोजन करण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी विविध विषयांचे अभ्यासक्रम असतील. शिक्षण आयुक्त या मंडळाचे अध्यक्ष असतील. तर शिक्षण विभागाचे अन्य संचालक या मंडळावर सदस्य असतील. विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच तंत्र व शिक्षण विभागाचे संचालकही या मंडळावर सदस्य असतील.रात्रशाळा सुरुच राहणार : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन झाले तरी एकही रात्रशाळा बंद होणार नाही. जे विद्यार्थी रात्र शाळांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहेत, त्यांचे शिक्षण पुढेही सुरु राहील. त्यामुळे रात्रशाळा भविष्यामध्ये बंद होतील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
‘राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करणार’
By admin | Published: May 31, 2017 4:34 AM