कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज एमपीएससीची राज्य सेवापूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:08+5:302021-03-21T04:07:08+5:30
मुंबई : आतापर्यंत तब्बल चार वेळा लांबणीवर पडलेली एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा अखेर आज राज्यातील ८०० केंद्रांवर पार ...
मुंबई : आतापर्यंत तब्बल चार वेळा लांबणीवर पडलेली एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा अखेर आज राज्यातील ८०० केंद्रांवर पार पडणार आहे. राज्यातील २ लाख ४३ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, सुरक्षेसंबंधित सर्व खबरदारी आयोगाकडून पूर्ण करण्यात आल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून, विद्यार्थ्यांसाठीही एसओपी जाहीर करण्यात आल्या आहेत.
वेळापत्रकाप्रमाणे या परीक्षा पार पाडण्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना एमपीएससीकडून या परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुढील परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. कधी कोरोना काळामुळे तर कधी समाजातील आरक्षणाच्या तिढ्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर याचा परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थींनी व्यक्त केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर
एमपीएससी उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल संधीची मर्यादा निश्चित केली असून, यापुढे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीतजास्त सहा वेळा परीक्षा देता येणार आहे. इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीतजास्त नऊ वेळा परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणखी चिंतातुर झाले. या पार्श्वभूमीवर मागील वेळी परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला; आणि दुसऱ्या दिवशीच सरकारकडून परीक्षेचे २१ मार्च रोजी पुनर्नियोजन करण्यात आले.