Join us

मतदारांच्या आळसाला राजकीय फोडणी

By admin | Published: February 23, 2017 6:53 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून

चेतन ननावरे/ मुंबईमुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नावे गायब झाल्याची एकच बोंब उठली. आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या प्रकरणी शंका उपस्थित करत फेरमतदानापासून चौकशीपर्यंतच्या विविध मागण्याही केल्या. मुळात यादीत नाव नसणे, हा ऐन मतदानादिवशी जागा झालेल्या मतदारराजाच्या आळशीपणाचा प्रकार असून राजकीय पक्षांनी मात्र त्याला आपल्या सोयीप्रमाणे फोडणी दिल्याने बहुतेक मतदान केंद्रांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.निवडणूक आयोगाने याआधी २०१४ सालीही लोकसभा निवडणुकीवेळी स्यु-मोटो घेत मतदार यादीतून मतदारांची नावे वगळल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हा प्रकार एका दिवसात होत नसून ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यात आयोगाकडून मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतर मयत, मतदानास गैरहजर, स्थलांतरित, दुहेरी नोंदणी असलेले अशा विविध कारणांस्तव मतदारांची नावे वगळण्यासाठी निवडली जातात. त्यानंतर वर्तमानपत्रात जाहिरात देऊन निवडणूक कार्यालयांबाहेर यादीतून वगळण्यात येणाऱ्या मतदारांच्या नावाची यादी लावली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे या यादीची एक प्रत प्रत्येक प्रस्थापित राजकीय पक्षांनाही पाठवली जात असल्याची माहिती त्या अधिकाऱ्याने दिली. या सर्व प्रक्रियेनंतरही हरकती आल्या नाहीत, तर नावे वगळण्यात येतात. मात्र बहुतांश मतदार या प्रक्रियेकडे गंभीरतेने पाहत नाहीत. शिवाय निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची तपासणी करत नाहीत. थेट मतदानादिवशी मतदार ओळखपत्र आहे, म्हणून मतदार यादीत नाव असेल, असे गृहीत धरून कित्येक मतदार केंद्रांवर गोंधळ घालतात. शहरासह उपगनरात बहुतेक केंद्रांवर मंगळवारी झालेल्या मतदार यादीचा गोंधळ हा त्याचाच एक भाग होता, असेही संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार२०१२ साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीवेळी मुंबईत १ कोटी २ लाख ८६ हजार ५७९ मतदारांची संख्या आयोगाकडे नोंद होती. २०१४ साली स्यु-मोटो घेत आयोगाने नावे वगळल्यानंतर मुंबईत केवळ ९६ लाख ९१ हजार २०७ मतदार असल्याचे स्पष्ट झाले.२०१७ साली मुंबईतील मतदारांचा आकडा ९१ लाख ८० हजार ४९७ इतका होता.इतके दिवस झोपला होता का?मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये सातत्याने निवडणूक आयोगाने नावनोंदणी मोहीम राबवली. त्या वेळी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन आयोगाने सातत्याने केले होते. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये मनपा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यावेळीच गोंधळ घालणाऱ्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली होती. मात्र अंतिम यादी जाहीर झाली, त्या वेळी कोणत्याही मतदाराने किंवा राजकीय पक्षाने इतकी नावे का वगळण्यात आली? याचा जाब विचारला नाही. त्यामुळे मतदानादिवशी गोंधळ घालणारे राजकीय नेते, याआधी झोपले होते का, असा सवाल आयोगाच्या अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.