आराेग्य विभाग; चाचण्यांमध्ये दुप्पट वाढ केल्याचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मार्च महिन्यात १९ टक्के असलेले काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण एप्रिल महिन्यात पाच टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्यात पॉझिटिव्हिटी प्रमाण २४.४८ टक्के असल्याची नोंद आहे. तर राज्याचा एकूण पॉझिटिव्हिटीचे प्रमाण सध्या १७ टक्के आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून दुप्पट करण्यात आले. परिणामी, यामुळे पॉझिटिव्हिटी दरात वाढ झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात राज्यात ७१ लाख ३० हजार ९४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७ लाख ४६ हजार ३०९ कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर मार्च महिन्यात एकूण ३४ लाख ४५ हजार ७८५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यात ६ लाख ५१ हजार ५१३ रुग्णांचे निदान झाले.
सध्या राज्याचे सरासरी पॉझिटिव्हिटी प्रमाण २५.५५ टक्के आहे. मात्र राज्यातील १४ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अधिक असून ही चिंतेची बाब आहे. त्यात उस्मानाबाद ३९.२५ टक्के, परभणी ३६.७८, हिंगोली ३६.७०, नागपूर ३५.०२ आणि गडचिरोली ३४.३० टक्के इतके प्रमाण आहे.
* मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी हाेणार!
राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, सध्याचे कठोर निर्बंध पुढचे आणखी काळ तसेच ठेवले पाहिजेत. जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील, रुग्णालयांवरील ताण कमी होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल, असे निरीक्षण आहे. मास्कचा वापर, सॅनिटायजर, शारीरिक अंतर राखणे हे नियम कायमच पाळले पाहिजेत. साेबतच यंत्रणांनी गर्दीची ठिकाणे बंद करणे, रुग्णांच्या संपर्कातील सहवासीतांचा शोध घेणे, आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, या उपायांवर भर दिला पाहिजे.
--------------------------