Join us  

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय मंडळाला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्यक्ष पाहणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्यक्ष पाहणी करून शासकीय कार्यालय या गटात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. हॉटेल, शाळा, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये व मार्केट अशा ६ गटांत नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा घेण्यात आली होती. वाशी येथील विभागीय मंडळातून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संपूर्ण मुंबई विभागाचे कामकाज पाहिले जाते.

मुंबई विभागीय मंडळाचा विस्तार मोठा असला तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कर्मचारी व व्यवस्थापन विभागाने सर्व काळजी घेतली आणि घेत आहोत. एवढ्या मोठ्या मंडळातील रद्दीचे व्यवस्थापन, येणाऱ्या-जाणाऱ्या शिक्षक, विद्यार्थ्यांची स्वच्छता, मंडळातील कार्यालयांची स्वच्छता या सगळ्याची काळजी घेतली गेली. त्यामुळे विभागीय मंडळाला मिळालेला पुरस्कार हा एकाचा नसून मुंबई विभागीय मंडळाच्या टीमचा असल्याची प्रतिक्रिया विभागीय सचिव संदीप संगवे यांनी दिली.

शहरातील रहिवाशांमध्ये स्वच्छतेबद्दल अधिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, त्याची विल्हेवाट, स्वच्छतागृहांची स्वच्छता, उपलब्धता, अभ्यांगतांची स्वच्छता व काळजी या आधारावर या स्पर्धेचे गुणांकन करण्यात आले आहे.