एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:51+5:302021-03-22T04:06:51+5:30
अखेर विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी, २१ मार्च रोजी दोन ...
अखेर विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी, २१ मार्च रोजी दोन सत्रांत घेण्यात आलेली एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा मुंबईत सुरळीत पार पडली. कोरोना संसर्गाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि मुंबईतील, तसेच राज्यातील कोणत्याही केंद्रावर कोणताही गोंधळ उडाला नसल्याची माहिती एमपीएससीचे सहसचिव सुनील औताडे यांनी दिली. कधी कोरोनाच्या, तर कधी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४ वेळा पुढे ढकलण्यात आलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राज्यातील ८०० केंद्रांवर २ लाख ४३ हजार विद्यार्थी एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणार होते. मात्र, परीक्षेअंती विविध जिल्ह्यांतील केंद्रावरून अनेक विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, राज्यातील कोणत्याही केंद्रावर गोंधळ झाला नाही आणि परीक्षेअंती जिल्हानिहाय उपस्थितीचा अहवाल सध्या देता येणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत परीक्षा सुरळीत
इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबईतही ५१ केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र एक-दोन ठिकाणी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाल्याने शारीरिक अंतराच्या नियमांना बगल दिली असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश क्रीडा संयोजक प्रथमेश रासकर यांनी दिली. केंद्रामध्ये सुरक्षित अंतर राखले गेले. मात्र, परीक्षा २ सत्रात होती आणि सकाळी १० ते ४ च्या २ सत्रांदरम्यान विद्यार्थ्यांना केंद्रातून बाहेर पडता न आल्याने खाण्याचे हाल झाल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी दिल्या. याशिवाय परीक्षार्थी उमेदवारांना इतर कोणत्याही समस्या न आल्याचेही त्यांनी सांगितले.
कोट
राज्यातील केंद्रावर कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सुरक्षितता आणि शारीरिक अंतराच्या सर्व सूचनांचे आणि नियमांचे पालन करीत असताना परीक्षा सुरळीत पार पडली.
- स्वाती म्हसे पाटील, प्रधान सचिव, एमपीएससी