राज्यातले एसईझेड, आयटी धोरण नापास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 06:33 AM2020-03-07T06:33:49+5:302020-03-07T06:33:57+5:30
गेल्या १८ वर्षांत मंजूर २५१ पैकी फक्त ३० एसईझेड राज्यात सक्रिय आहेत. तर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मंजूर ५३० पैकी १९० (३६ टक्के) आयटी पार्क च कार्यान्वित असल्याची माहिती हाती आली आहे.
मुंबई : विदेशी गुंतवणुकीला चालना, निर्यातीला प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मिती ही त्रिसूत्री समोर मांडून राज्यात विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) आणि माहिती तंत्रज्ञान धोरण (आयटी) जाहीर करण्यात आले. मात्र, गेल्या १८ वर्षांत मंजूर २५१ पैकी फक्त ३० एसईझेड राज्यात सक्रिय आहेत. तर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मंजूर ५३० पैकी १९० (३६ टक्के) आयटी पार्क च कार्यान्वित असल्याची माहिती हाती आली आहे.
२००१ ते २०१९ सालापर्यंत एसईझेडसाठी २५१ प्रस्ताव राज्य सरकारकडे आले. त्यापैकी बहुसंख्य ठिकाणी सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून दिली. येथे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने विविध सवलती जाहीर केल्या. मात्र, केवळ ४,२३१ हेक्टर जागेवर सुमारे ३६,३५२ कोटींची गुंतवणूक असलेले ३० एसईझेड कार्यान्वित झाले. यातून ५ लाख ५४ हजार जणांना रोजगार मिळाल्याची माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून हाती आली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधांच्या निर्मितीसाठी खासगी क्षेत्रांत ५३० आयटी पार्क सरकारने मंजूर केले. त्यात पुणे विभागात १८६, मुंबई उपनगरांत १७२, ठाणे जिल्ह्यात १५८, नागपूर, नाशिक येथे प्रत्येकी पाच, औरंगाबाद तीन आणि वर्धा येथील एका आयटी पार्कचा समावेश आहे. मात्र, त्यापैकी ३५ टक्के म्हणजे १९० आयटी पार्क कार्यान्वित झाले. तिथे १९,९२७ कोटींची गुंतवणूक झाली असून ५ लाख ३० हजार जणांना रोजगार मिळाला.
एसईझेडसाठी दिलेल्या जागांवर प्रस्तावित उद्योगधंदे उभे राहिले नसतील तर त्या जागा पुन्हा सरकारजमा करून तिथे सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची उभारणी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. त्यामुळे सरकार ही जागा पुन्हा संपादित करण्याची धमक दाखविणार का, असा प्रश्न यानिमित्ताने सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे.
>आयटीत १३ लाख रोजगारांची प्रतीक्षा
सरकारच्या मंजुरीनंतरही ३४० आयटी पार्क सुरू होऊ शकले नाहीत. तिथे ७०,९९४ कोटींची गुंतवणूक आणि १२ लाख ९५ हजार लोकांना रोजगार मिळेल असा अंदाज होता. मात्र, रोजगाराची प्रतीक्षा कायम आहे.
निम्मे एसईझेड पुणे विभागात
राज्यात कार्यरत ३० पैकी १५ एसईझेड हे पुणे विभागात आहेत. त्याखालोखाल कोकण (९), औरंगाबाद (३), नागपूर (२), आणि नाशिक (१) यांचा क्रमांक लागतो. अमरावतीत एकही एसईझेड नाही.