"राज्य इगोसाठी नाही, जनतेसाठी चालवायचं", आरे कारशेडच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 04:05 PM2020-09-08T16:05:17+5:302020-09-08T16:21:04+5:30
आरे कारशेडच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
मुंबई - मुंबई मेट्रो३ प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाल्यापासून गाजत असलेल्या आरे कारशेडचे काम बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून, कारशेड पहाडी गोरेगाव येथे स्थलांतरीत करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, आरे कारशेडच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
विधानसभेत आरेमधील कारशेडचे काम बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरेची जागा उच्च न्यायालय, ग्रीन टेब्युनल, सुप्रीम कोर्ट मान्यता मिळाल्यानंतर निश्चित झाली होती.त्यानंतर तिथे काम सुरू झालं. डेपो, बाउंड्री वॉल, बिल्डिंग, अंडरपास तयार केला आणि पॅकेज सेव्हन त्याचा टनेल सगळं काम केलंय. आता ही कारशेड रद्द झाल्यानंतर या कामाचे पैसे कोण देणार. कसे वसूल होणार या कामाचे पैसे. ज्या ठिकाणी मेट्रोचं काम बंद ठेवल्यामुळे दर दिवशी पाच कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
मेट्रोचे काम बंद ठेवले तर दिवसाला ५ कोटी नुकसान.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) September 8, 2020
आम्ही त्यावेळी सर्व पर्याय पडताळून पाहिले. कोणताच पर्याय नसल्याने आरेची जागा अंतिम केली. वाढलेला खर्च, जागा खरेदीचा खर्च अन् भार पडणार सामान्य मुंबईकरांवर.
प्रत्येक प्रश्न प्रतिष्ठेचे करायचे नसतात: @Dev_Fadnavis
आता मेट्रोची कारशेड पहाडी गोरेगाव येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यासाठी डीपीआर तयार झाला आहे का? आरेची जागा सरकारची जागा, पहाडी गोरेगावची जागा विकत घ्यावी लागणार. त्याचा परिणाम तिकिटांच्या किमतीवर येणार आहे. त्यामुळे ही मेट्रो किफायतशीर राहणार नाही. त्यामुळे नम्र विनंती करतो पुनर्विचार करावा.. कारशेड आहे त्याच ठिकाणी ठेवून ही लाईन पूर्ण करण्याचं काम करावं. असा टोला फडणवीस यांनी लगावला.
यावेळी गाजत असलेल्या मुंबई पोलिसांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मला पूर्ण कल्पना आहे. मात्र कधी कधी राजकीय हितसंबधांचा प्रभाव पोलिसांच्या कामगिरीवर होतो. आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबाबत म्हणाल तर या सभागृहामध्येही अनेकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही काळापूर्वी कल्याणच्या सभेत राज्यातील पोलीस हे भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचं हे एक उदाहरण आहे. चर्चा करायची असेल, विषयांतर, विषय बदलायचे असतील तर ते कसं काय बदलता येतात हे आपण बघितलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या