Join us

राज्याचेही स्वतंत्र शैक्षणिक चॅनेल हवे, शिक्षक परिषदेची विद्या प्राधिकरणकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 4:43 PM

राज्यातील शाळांची व शिक्षकांची संख्या पाहता शिक्षण विभागाने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करावी, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी विद्या प्राधिकरणाकडे केली आहे.

मुंबई : राज्यातील शाळांची व शिक्षकांची संख्या पाहता शिक्षण विभागाने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करावी, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी विद्या प्राधिकरणाकडे केली आहे. यासंदर्भात सोमवारी अनिल बोरनारे यांनी विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ सुनिल मगर यांना पत्र लिहून मागणी केली आहे. 

आजपासून इयत्ता पहिली व आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाले असून त्यासाठी राज्याने गुजरात सरकारच्या वंदे गुजरात चॅनेलची मदत घेतली आहे. गुजरात सरकारने २०१५ मध्ये २४ तास चालणारे १६ चॅनेल सुरू केले असून या वाहिन्यांच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम विद्यार्थीशिक्षकांना दाखविले जातात. महाराष्ट्रात १ लाखाहून अधिक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून साडेसात लाख शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. या शाळांमध्ये २ कोटीहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये कमी शाळा असूनही शासनाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन स्वतंत्र चॅनेलची निर्मिती केली आहे.  याप्रकारे राज्यातील विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा, मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा, पुनर्रचित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन व शैक्षणिक कार्यक्रम या चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतात. तर शिक्षक व मुख्याध्यापकांना पुनर्रचित अभ्यासक्रम, शिक्षणात होणारे बदल याबाबत उद्बोधन होऊ शकते व  त्याचा फायदा राज्यातील गुणवत्तवाढीसाठी होऊ शकतो. राज्यातील सुमारे ७० हजार शिक्षक टेक्नोसॅव्ही झाले आहेत या शिक्षकांनी शेकडो शैक्षणिक अँप ची निर्मिती केली आहे. अध्यापनाचे अनेक तंत्र शिक्षकांनी युट्युबवर अपलोड केले आहे.

टॅग्स :शिक्षणविद्यार्थीशिक्षक