'ओमिक्रॉनची अद्याप राज्याला भीती नाही, शाळा 1 डिसेंबरलाच सुरू होणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 08:26 AM2021-11-29T08:26:35+5:302021-11-29T08:37:29+5:30
ओमिक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे दिसत नाही, तसेच ज्युनोमिक परिस्थितीचा कुठलाही तसा अहवाल नाही
मुंबई - ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठविण्याविषयी पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या अगोदर आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर, आता मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शाळा सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे.
ओमिक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. कारण, त्याची कुठेही लागण झाल्याचे दिसत नाही, तसेच ज्युनोमिक परिस्थितीचा कुठलाही तसा अहवाल नाही. त्यामुळे, अतिशय चिंता बाळगण्याची गरज नाही. पण, दक्षिण आफ्रिकेती त्याचा रिफ्लेक्ट झालेला प्रभाव लक्षात घेता, काळजी घ्यायला हवी म्हणून मुख्यमंत्र्यांसमेवत आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानुसार, 1 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होतील, असेही राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले.
जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना
राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा संचालनालयाकडून जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका स्तरावर या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
समुपदेशनाची व्यवस्था करा
क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी आणि शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोना बाधित आढळल्यास शाळेतील कोविड प्रतिबंधक कृती योजनेचा आढावा घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मुलांच्या व शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन नैराश्य, तणाव निर्माण होऊ शकतो यासाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्याच्या सूचनाही शाळांना करण्यात आल्या आहेत.