राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम; शिवसेनेला हवी आहे अमित शहांची मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 07:05 AM2019-11-03T07:05:11+5:302019-11-03T07:05:45+5:30
भाजपला ठेवले वेटिंगवर । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे पडल्याची टीका
मुंबई : हरयाणातील सत्तास्थापनेचा तिढा दोन दिवसांत सोडविणाऱ्या दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी निकालाला ९ दिवस झाले तरी महाराष्ट्रातील तिढ्याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तास्थापनेबाबत एकटे पडल्याची टीका करीत शिवसेनेने आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मध्यस्थी करावी, असे एकप्रकारे सूचित केले आहे.
हरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. अशावेळी अमित शहा यांनी पुढाकार घेत जननायक जनता पार्टीचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाराष्ट्रात अशाच पद्धतीने बहुमतासाठी शिवसेनेची गरज असल्याने अमित शहा मुंबईत येऊन चर्चा करतील, अशी अपेक्षा होती पण, ते अद्याप आलेले नाहीत वा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवरूनही चर्चा केलेली नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांना डिवचले आहे. मुख्यमंत्री एकटे पडल्याचे दिसतात या राऊत यांच्या वाक्याचा अर्थ शिवसेनेला आता मध्यस्थीसाठी अमित शहाच हवेत आणि त्या शिवाय चर्चा केली जाणार नाही असा घेतला जात आहे.
लहान मित्र पक्षांचे
राज्यपालांना साकडे
भाजपच्या लहान मित्रपक्षांच्या नेत्यांनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी भाजपला आमंत्रित करण्याची मागणी केली. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (रिपाइं), महादेव जानकर (रासप), सदाभाऊ खोत (रयत क्रांती संघटना), संदीप पाटील (शिवसंग्राम) यांचा समावेश होता. सरकार स्थापन करण्याबाबत चांगला तोडगा आठवले यांनी त्यांच्या कवितेतून सुचवावा, अशी मिश्किल सूचना राज्यपालांनी यावेळी दिली.
राऊत यांचा आक्रमक पवित्रा मात्र कायम
‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी हीच ती वेळ... अभी नहीं तो कभी नहीं’ असे सांगत मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहील, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी कायम ठेवला आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित केले आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता राऊत म्हणाले की, नाव जाहीर झालेली व्यक्ती अद्याप मुख्यमंत्री झालेली नाही. जनतेला परिचित असलेली शिवसेनेची व्यक्तीच मुख्यमंत्री होईल आणि तशा हालचाली लवकरच दिसतील, असा दावा त्यांनी केला.
तेव्हापासून चर्चेचे दार उघडेना
दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना, अडीच-अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद ठरलेले नव्हते, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने त्याच दिवशी सत्तावाटपाच्या चर्चेसाठी होणारी बैठक रद्द केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये बोलणीच होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री पदाबाबत काय शब्द दिला होता हे अमित शहांकडूनच आता ऐकू, असा शिवसेनेत सूर आहे. या पदाबाबत काय करायचे, महत्त्वाची मंत्रिपदे मिळण्याबाबत घ्यायचा निर्णय हे सगळे काही अमित शहांबरोबरच बोलू, असे सांगत शिवसेनेने भाजपला वेटिंगवर ठेवले आहे.
युतीवरील संकट दूर
होईल - चंद्रकांत पाटील
महायुतीवर सत्ता स्थापनेबाबत आलेलं अवकाळी संकट लवकरच दूर होईल आणि ते दूर करण्यासाठी आमचे नेतृत्व समर्थ आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. सत्तास्थापनेची कोंडी फोडण्यासाठी मी अंबाबाईला प्रार्थना केली आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार - महाजन
शिवसेनेला काहीही बोलू द्या
जळगाव : सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेचे नेते काहीही बोलत असले तरी मुख्यमंत्री भाजपाच होणार आहे. विधानसभेची मुदत अजून ९ नोव्हेंबरपर्यंत असून तोपर्यंत सत्ता स्थापनेचाही तिढा सुटेल, असा दावा जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात केला. सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत व इतर मंडळी भाष्य करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र एकाकी पडले असल्याच्या मुद्यावर बोलताना महाजन म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे त्यांच्या परिसरात व मी जळगावात पाहणी दौºयात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकाकी आहे, असे कोणी म्हणू नये. शिवसेनेचे नेते काहीही बोलत असले तरी आम्ही काही न बोलण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ‘वेट अॅण्ड वॉच’च सध्या महत्त्वाचे असून मुख्यमंत्री भाजपाच होणार आहे.
६ किंवा ७ ला शपथविधी
मुनगंटीवार यांचा दावा
भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता स्थापन करण्यासंदर्भातील कोंडी लवकरच फुटेल आणि महायुतीच्या सरकारचा शपथविधी ६ किंवा ७ नोव्हेंबरला होईल, असा दावा भाजपचे नेते आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शिवसेना-काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ होत नाही. शिवसेना कधीही काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही आणि काँग्रेस तो देणार नाही. दूध लिंबू एकत्र येऊ शकत नाहीत, दूध साखर एकत्र येतात. शेर कभी घास नही खाता, असे ते शिवसेनेसंदर्भात म्हणाले.