लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : राज्यात लोकशाहीची थट्टा चालली आहे. तीन नापास झालेले विद्यार्थी हे मेरिटमध्ये आल्यासारखे राज्यात सत्ता भोगत आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. मात्र, आम्ही पासा पलटवू आणि त्यासाठी आम्हाला शिडीची गरज लागणार नाही, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील आरक्षण क्रमांक ३०० या खेळाच्या मैदानात उभारल्या जाणाऱ्या स्वर्गीय प्रमोद महाजन कला दालनाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. शिवाय देशातील पहिल्या ६८ मीटर उंचीच्या अग्निशमन दलात दाखल झालेल्या ‘टर्न टेबल लॅडर’चे लोकार्पण व बीएसयूपी योजनेतील गाळेधारकांना चाव्यांचे वाटप फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खा. पूनम महाजन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आ. रवींद्र चव्हाण, मिहीर कोटेचा, निरंजन डावखरे, आयुक्त डॉ. विजय राठोड तसेच पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, प्रमोद महाजन यांनी राजकारणात आम्हाला घडविले. नेतृत्व, वक्तृत्व व कर्तृत्व काय असते ते शिकवले. आधुनिक भारताच्या शिल्पकारांमध्ये जी नावे प्रामुख्याने घेतली जातात त्यात संपर्कक्रांतीसाठी महाजन यांचे नाव घेतले जाते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात महाजन यांनी मोबाइल-इंटरनेट क्रांती घडविली. माझ्यासारखे अनेक नेते प्रमोदजींनी तयार केले. प्रमोदजी केवळ राजकारणीच नव्हे, तर सिनेमा, नाटक, साहित्य यामधील जाणकार होते. कलासक्त व्यक्ती असलेल्या महाजन यांचे नाव दिलेल्या कलादालनाचे भूमिपूजन करण्याची संधी आपल्याला मिळाली त्याबद्दल आपण पालिकेचे आभारी आहोत, असे फडणवीस म्हणाले.
बीएसयूपी घोटाळ्यामुळे शिवसेनेचा बहिष्कार
महापालिकेच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. भाजप-शिवसेना युतीचे शिल्पकार स्व. प्रमोद महाजन यांच्याबद्दल शिवसेनेला मनस्वी आदर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाजन कलादालनास निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे कलादालन लवकरात लवकर पूर्ण करण्याची खबरदारी शिवसेना घेईल; पण बीएसयूपी योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी शासनाने लावली असताना सदर योजनेतील चाव्या वाटपास उपस्थित राहणे भ्रष्टाचाराला वाव देण्यासारखे असल्याने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
- आ. प्रताप सरनाईक, शिवसेना