इंग्लंडहून आणलेल्या वाघनखांचे राज्यभर प्रदर्शन
By स्नेहा मोरे | Published: January 18, 2024 06:53 PM2024-01-18T18:53:34+5:302024-01-18T18:55:04+5:30
विशेष प्रदर्शनासाठी सातारा, कोल्हापूर व नागपूर या जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरीय समिती आणि मुंबई शहर या जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
मुंबई - इतिहासाचा मौल्यवान आणि ऐतिहासिक ठेवा असेलल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाशी जनतेचा भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडहून आणलेली ही वाघनखे सर्वसामान्यांना पाहता यावी यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यभर ' शिवशस्त्रशौर्य ' प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरविले आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विशेष समितीची नियुक्त करण्यात आली आहे. राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात मुंबईत हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
या विशेष प्रदर्शनासाठी सातारा, कोल्हापूर व नागपूर या जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरीय समिती आणि मुंबई शहर या जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. यात मुंबईसाठी नियुक्त केलेल्या समितीत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक सब्यसाची मुखर्जी अध्यक्ष स्थानी असणार आहेत. त्यांच्यासोबत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक , रत्नागिरी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांचा सदस्य म्हणून तर सदस्य सचिव म्हणून पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या उपसंचालकांचा सहभाग असणार आहे. तर जिल्हा समितीत सातारा, कोल्हापूर व नागपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, शिक्षणाधिकारी, अभिरक्षक आणि माहिती जनसंपर्क अधिकारी यांचा समावेश आहे.
अशी असेल समितीची कार्यकक्षा
प्रदर्शन आयोजनाचे संपूर्ण व्यवस्थापन सांभाळणे, जिल्ह्यातील आवश्यक विभागात समन्वय ठेवणे, प्रवास व प्रदर्शनादरम्यान सुरक्षा पुरविणे, प्रदर्शनासाठी स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार करणे, या प्रदर्शनाविषयी शालेय स्तरावर प्रसार करणे, प्रदर्शनाची माहिती व प्रसार करणे इ.