मुंबई : अनेक प्रलंबित मागण्यांच्या निमित्ताने निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने सोमवार, २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे नव्या वर्षात कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा कोलमडण्याचा धोका आहे, ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. संपाचा परिणाम टाळण्यासाठी छोट्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याबरोबरच आरोग्यसेवा सुरळीत राखण्यासाठी सहयोगी प्राध्यापकांची मदत घेण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहूनही पालिका आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडून चर्चेसाठी बोलावणे न आल्याने, निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख, प्राध्यापक या सर्वांना सूचना देऊन सेवेवर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टळणार असल्याचे जे.जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेनेही कंबर कसलीकेईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.संगीता रावत यांनी सांगितले की, केईएममध्ये बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृहाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात अन्य प्राध्यापक व वरिष्ठ डॉक्टरांकडे देण्यात आली आहे.
निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?- वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी १,४३२ पदांची निर्मिती- सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांची पदे भरणे.- महागाई भत्त्याची थकबाकी देणे.- सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे.- वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील असमानता दूर करणे.
राज्यपाल, वैद्यकीय शिक्षणमंत्री, संबंधित विभागाचे सचिव, आयुक्त व संचालक यांच्यासोबत मार्ड संघटनेच्या बैठकाही झाल्या. मात्र, यातून निष्पन्न काहीच होत नसल्याचे डॉक्टर सांगतात. मागण्या मान्य न झाल्याने राज्यव्यापी संप पुकारला आहे. - डॉ.अविनाश दहिफळे, अध्यक्ष, मध्यवर्ती मार्ड संघटना.