मुंबई : एकसारखे व उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळाची स्थापना करण्यात येईल. नुकताच सरकारकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर पालक-शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी, पालकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याचे स्पष्टीकरण देत ही माहिती दिली.राज्यात जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६६ हजार ३३ शाळा कार्यरत आहेत. त्यामधील ८१ शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू होते. फक्त ८१ शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण न देता जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये ते देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे मंडळ सुधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम तयार करणार असून पहिल्या वर्षी या ८१ शाळांतील पाचवीच्या इयत्तेसाठीआणि नंतर राज्यातील सर्वच शाळांसाठी असा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम तयार करण्यात येईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. बरखास्त केलेल्या शाळांमधील पालकांनी घाबरण्याचे कारण नसून सरकारकडून आनंददायी व रचनात्मक उपक्रम लवकरच सर्व शाळांमध्ये राबविण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली. या शाळा बंद होणार नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी शिक्षणमंत्री म्हणून स्वत: घेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ होणार स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 5:29 AM