लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ४० लाख लसींचा नवा साठा मिळणार आहे, तर १८ ते ४४ वयोगटासाठी २० लाख लसींच्या खरेदीचा प्रस्ताव केंद्राकडे अखेरच्या टप्प्यात असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले.
लसींच्या या साठ्यातून दुसरा डोस घेणाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. तसेच ४५ हून अधिक वयोगटाला पहिला डोसही देण्यात येईल. राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले की, लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य देतानाच, सक्रिय रुग्ण, पॉझिटिव्हिटी दर हे मुद्दे समोर ठेवून लसींचे वितरण करण्यात येईल.
केंद्राकडून मिळणारा लसींचा साठा आणि राज्य खरेदी करत असलेला लसींचा साठा याचा समतोल राखून, त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण पूर्ववत करण्याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.