राज्याला केंद्राकडून लवकरच मिळणार लसींचे सात लाख डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:05 AM2021-07-23T04:05:33+5:302021-07-23T04:05:33+5:30
मुंबई : राज्याने लसीकरणात देशात आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत चार कोटी दोन लाखांहून अधिक जणांनी लस घेतली आहे. ...
मुंबई : राज्याने लसीकरणात देशात आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत चार कोटी दोन लाखांहून अधिक जणांनी लस घेतली आहे. राज्याला आता लवकरच केंद्राकडून लसीचा नवा साठा उपलब्ध होणार आहे. त्यात कोविशिल्डचे ५.२३ लाख डोस तर, कोव्हॅक्सिनचे १.६२ लाख डोस मिळणार आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, लवकरच राज्याला लसीचा नवा साठा मिळणार आहे. केंद्राकडून जवळपास सात लाख लसीचे डोस मिळतील. राज्य शासनाकडून सातत्याने केंद्राला लसीच्या साठ्याचे नियमन करण्याविषयी मागणी करण्यात येत आहे. लसीच्या साठ्याचे नियमन झाल्यास दिवसाला १० लाख डोस देण्याची सेवा सुविधा असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात मुंबईत आतापर्यंत ६७ लाख डोसचे वितरण करण्यात आले आहे, तर राज्यातील पाच जिल्ह्यात १० लाख डोस देण्यात आले आहेत, त्यात अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, सांगली आणि साताऱ्याचा समावेश आहे. पुण्यात आतापर्यंत ५६ लाख डोस, ठाणे ३१ लाख डोस आणि नागपूरमध्ये २१ लाख डोस वितरित करण्यात आले आहेत.