राज्यातील 'जलक्रीडा' सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली करणार तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 06:51 PM2020-12-07T18:51:17+5:302020-12-07T18:51:22+5:30
अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रिडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे.
मुंबई : राज्यातील जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) सुरु करण्याबाबत शासन लवकरच आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचे आश्वासन आज राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रिडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी आज दुपारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा सुरु करण्याबाबत निवेदन दिले.अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रिडा व्यवसायाशी निगडीत विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले.
अस्लम शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. राज्य सरकारचा बंदरे विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोंडकर, काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, देवबाग वाॅटर स्पोर्टचे राजन कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.