लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील विज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी असल्याची ओळख राज्याने दिली असून भविष्यातही महाराष्ट्र हे भारतासह जागाचे मार्गदर्शन करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच गुरुत्वीय लहरींवरील संशोधनासाठी जागतिक पातळीवरील महत्त्वाची लायगो वेधशाळा राज्यात लवकरच उभारण्यात येणार असल्याचे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक तथा ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे विज्ञान क्षेत्रातील योगदान या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ५२ वे पुष्प गुंफताना शेखर मांडे बोलत होते. ते म्हणाले, राज्यासाठी अभिमानास्पद ठरेल असा लायगो वेधशाळा हा गुरुत्वीय लहरींवरील संशोधनासाठी जागतिक पातळीवरील महत्त्वाचा भारत सरकारचा प्रकल्प येत्या काळात महाराष्ट्रात उभारला जाणार आहे. भारतातील गुरुत्वीय लहरींविषयीचे सैद्धांतिक कार्य बंगळुरू येथे प्रा. विश्वेश्वरैय्या यांनी केले तर यासंबंधी महत्त्वाच्या सिद्धांतांवर पुण्यात कार्य झाले.
शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी मुंबईतील ट्रॉम्बे भागात स्थापन केलेल्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आधुनिक भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम याच संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर राबविला गेला. अणुऊर्जा विभागाचे मुख्यालयही मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे स्थित आहे. मुंबईतील हाफकिन या संस्थेच्या माध्यमातूनच देशात सर्पदंशांवरील बहुतांश लस निर्मितीचे कार्य केले जाते.
पुणे येथील नॅशनल रिसर्च ऑफ व्हायरॉलॉजी ही देशातील अग्रगण्य संस्था कोरोना महामारीच्या काळात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. देशात उत्पन्न होणाऱ्या विषाणूजन्य रोगांवरील संशोधनात ही संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. पुण्यातच राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र असून या संस्थेच्या संचालकपदी सतत ७ वर्षे कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली होती व ही खूप गौरवास्पद बाब असल्याचेही शेखर मांडे यांनी नमूद केले. भारताला जेव्हा सर्व देश कोशिका देण्यास नकार देत होते तेव्हा १९८८ मध्ये डॉ. उल्हास वाघ व पुणे विद्यापीठाचे प्रा. मोडक यांच्या पुढाकाराने ही संस्था स्थापन झाली.