नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
दिल्लीत झालेल्या हिसांचाराच्या घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणैत हिने मंगळवारी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळालं आहे. त्याच देशांपैकी आपण एक आहोत, असं कंगनाने व्हिडिओद्वारे म्हटलं होतं.
लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत: ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरु आहे, अशी टीका कंगनाने केली आहे. आज जगात आपली थट्टा होत आहे. आपली काहीच इज्जत राहिलेली नाही. जेव्हा दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष देशात येतो तेव्हा काही लोकं नागडं होऊन बसतात. या देशाचं काहीच होणार नाही. कुणी या देशाला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, तर काही लोक देशाला दहा पावलं मागे खेचत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती देखील हिसकावून घ्या, असं विधानही कंगानाने केलं होतं.
कंगनाच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात सुरुवात केली. यासोबतच सहा दिग्गज ब्रँण्डने कंगनासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे. याची माहिती स्वत: कंगनाने ट्विटरद्वारे दिली आहे. कंगना याबाबत म्हणाली की, 'सहा ब्रँण्डनी माझ्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. काहींवर मी याआधीच करार केले होते. तर काही ब्रँण्डसोबत करार करणार होते. ते म्हणाले की, मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले, त्यामुळे ते मला त्यांची ब्रँण्ड अॅम्बेसेडर बनवू शकत नाहीत. त्यामुळे या सर्व ब्रँण्डना देखील मी अॅंटी नॅशनल दहशतवादी म्हणेन, असं कंगनाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, दिल्लीत मंगळवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी 15 FIR नोंदविण्यात आल्या असून त्यातील 5 FIR ईस्टर्न रेन्जमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. याशिवाय नजफगड, हरिदास नगर आणि उत्तम नगरमध्ये प्रत्येकी एक एफआयआर नोंदविण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर गृह मंत्रालयाने दिल्लीच्या काही भागांत इंटरनेट सेवा बंद केली आहे.
दिल्ली पोलीस आता सीसीटीव्ही फुटेडच्या माध्यमाने निदर्शनकर्त्यांचा शोध घेत आहे. यासाठी, लाल किल्ला, नांगलोई, मुकरबा चौक आणि सेंट्रल दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज काढण्यासाठी स्पेशल सेल आणि क्राइम ब्रांचची मदत घेतली जात आहे. यात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर, लाल किल्ल्यावर चढणाऱ्यांवर आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असेल. याच बरोबर, ज्यां नेत्यांनी शेतकऱ्यांना भडकावले अशा नेत्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे.