मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपाशी फारकत घेत शिवसेनेने आघाडीशी घरोबा केला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. पण संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलेलं विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
मात्र मनोहर जोशींनी केलेलं विधान हे त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिलं आहे. याबाबतीत त्या म्हणाल्या की, मनोहर जोशींनी केलेलं विधान वैयक्तिक, ती भूमिका शिवसेनेची नाही. त्यांच्या पिढीच्या मनात हे अशाप्रकारच्या भावना स्वाभाविक आणि भावनिक असलं तरीही तरीसुद्धा ती पक्षाची भूमिका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना ही महाविकास आघाडी मजबूत आहे. चांगल्याप्रकारे ती लोकांसाठी काम करत आहे. भाजपा मित्रपक्षांना संपविण्याच्या दृष्टीने काम करतं. ते व्यवहार्य नाही. त्यामुळे मनोहर जोशींचे विधान हे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपसात वाद करण्यापेक्षा थोडं सहन करावं, काही गोष्टी असल्यास त्यांनी एकमेकांना आग्रहानं सांगाव्यात, एकत्र काम केल्यास दोघांच्याही फायद्याचं ठरेल, अशी मला खात्री आहे. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्तानं, पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्याबाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपाबरोबर कधीच जाणार नाही, असं नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे. एकंदरीतच शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्यावर मनोहर जोशींनी सूतोवाच केले होते.
सध्या राज्यातील राजकारणात तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप रखडल्यामुळे महाविकास आघाडीत अद्याप काही आलबेल नाही अशीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे मनोहर जोशींचे विधान आणि त्यावरुन शिवसेनेने दिलेलं स्पष्टीकरण याचा परिणाम येणाऱ्या काळात स्पष्ट होतील.