आरटीओ विभागातील अर्थकारणाबाबत मोटार वाहन विभाग अधिकारी संघटनेचे निवेदन व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:07 AM2021-03-10T04:07:26+5:302021-03-10T04:07:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अनेक पदे रिक्त असून त्यावर पात्र अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी अर्थकारणाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अनेक पदे रिक्त असून त्यावर पात्र अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी अर्थकारणाचा ‘गिअर’ टाकल्याशिवाय ही बढती आणि बदली त्यांच्या पदरी पडत नाही. त्याचे अधिकारी ते मंत्री कसे धागेदोरे आहेत याबाबत मोटार वाहन विभाग अधिकारी संघटनेच्या नावाने निवेदन व्हायरल झाले आहे. दरम्यान, बदनामी केल्याप्रकरणी कार्यकारी अधिकारी संघटनेने तक्रार केली आहे.
या निवेदनात वर्धा येथील अधिकारी हे बढती आणि बदलीचे सूत्रधार आहेत. विभागानुसार बढती आणि बदलीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
त्यांनी बढती आणि बदलीच्या वसुलीसाठी काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्या वसुलीमधील अर्धाच भाग मंत्र्यांपर्यंत जातो, अर्धा भाग तो अधिकारी ठेवतो, असा आरोप करण्यात आला आहे, तर संघटनेचे नाव घेऊन बदनामी केल्याचा आरोप करत कार्यकारी अधिकारी संघटनेने पोलिसात तक्रार केली आहे.
आरटीओ विभागात जबाबदारी योग्यरीतीने पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. कामास टाळाटाळ करणारे अधिकारी हा खोडसाळ प्रकार करत आहेत. त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते संबंधित यंत्रणांना द्यावेत, त्या यंत्रणा कारवाई करतील.
वरिष्ठ अधिकारी, परिवहन विभाग
निवेदन कोणी केले याबाबत तक्रार करण्यात आली आहे, पण बदल्यांच्या अर्थकारणाबाबत सविस्तर उल्लेख केला आहे. त्याची दखल घेऊन आरोपांची सत्यता पडताळणी केली जावी.
एक अधिकारी, परिवहन विभाग.