डॉ. आंबेडकरांवरील वक्तव्याने भाजपची मनोवृत्ती उघड; उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 06:18 IST2024-12-19T06:17:59+5:302024-12-19T06:18:35+5:30
अमित शाह यांनी हे विधान संघाच्या इशाऱ्यावर केले आहे का, रामदास आठवले आता राजीनामा देणार का? शिंदेसेना आणि अजित पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान मान्य आहे का?, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली.

डॉ. आंबेडकरांवरील वक्तव्याने भाजपची मनोवृत्ती उघड; उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रातील महापुरुषांचा भाजपने याआधीही अपमान केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे भाजपची मनोवृत्ती उघड झाली आहे. बहुमत मिळाल्यामुळे त्यांना मस्ती चढली आहे, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शाह यांनी राज्यसभेत डॉ. आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानावरून ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मातोश्री' येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे आता महाराष्ट्राला कसेही वागवा ही भाजपची वृत्ती आहे, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र आणि देशाने आता तरी शहाणे झाले पाहिजे. भाजपच्या नेत्यांना गाठून शाह यांचे वक्तव्य मान्य आहे का, हे विचारले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
आठवले राजीनामा देणार का?
गेल्या तीन वर्षांपासून भाजप नेते महापुरुषांचा अपमान करीत आहेत. गृहमंत्री शाह यांनी आता कहर केला आहे. त्यावर भाजपचे घटक पक्ष कोणती भूमिका घेणार आहेत? केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आता राजीनामा देणार का? शिंदेसेना आणि अजित पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान मान्य आहे का? त्यावर ते काही बोलणार की नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला.
रा. स्व. संघाने खुलासा करावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने सांगितल्याशिवाय अमित शाह संसदेत असे वक्तव्य करणे शक्य नाही. त्यामुळे शहा यांनी हे विधान संघाच्या इशाऱ्यावर केले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला. भाजप आणि संघाने यावर भूमिका स्पष्ट करावी. तसेच, पंतप्रधान मोदी यांनी शाह यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.