Join us

मालवणच्या लढतीकडे राज्याचे लक्ष

By admin | Published: September 23, 2014 10:01 PM

प्रभावशाली नेत्यांमध्ये काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचे जाहीर केल्यानंतर मालवणची विधानसभा निवडणूक

संदीप बोडवे - मालवण -राज्यातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणले जाणारे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचे जाहीर केल्यानंतर मालवणची विधानसभा निवडणूक यावेळी राज्यभरात लक्षवेधी ठरणार हे निश्चित झाले. मालवण तालुक्यातून १९९० पासून नारायण राणे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मागील २५ वर्षात राणेंनी कर्तृत्त्वाच्या जोरावर इथे आपला प्रभाव निर्माण केला. राणे म्हटले की विजय हे जणू समीकरणच बनले. २००५ मध्ये राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मालवणची राजकीय समीकरणे बदलली. काँग्रेसवासी झालेल्या राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिले. शिवसेना संपवण्याच्या इराद्याने पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या राणेंनी विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करत शिवसेनेला धूळ चारली. शिवसेनेनेही पराभवातून धडा घेत जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला. या निवडणुकीत शिवसेना नारायण राणेंना तूल्यबळ लढत देण्याची शक्यता आहे.मागील ९ वर्षात जनसंपर्काच्या ताकदीवर शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी राणेंसमोर तगडे आव्हान निर्माण केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्या बाजूने मालवणवासीयांनी कौल दिला. राणेंच्या मालवणमधील सामर्थ्याला हा मोठा धक्काच होता.राज्यात प्रसिद्धी मिळालेला ‘राणे फॅक्टर’ येथे निष्प्रभ ठरला की काय, अशी चर्चा रंगू लागली. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘राणे फॅक्टर’ची पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे. शिवसेनेचे वैभव नाईक यांच्या विरोधात राणे फॅक्टर यशस्वी होतो की नवा ‘मालवण फॅक्टर’ उदयास येतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.सन २००५ मध्ये शिवसेना सोडून राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले. तरीही मालवण तालुक्याने पाठराखण केली. यानंतर मात्र हे चित्र बदलायला सुरुवात झाली. मागील ९ वर्षांच्या काळात राणे यांचा नंबर एकचा शत्रू असलेल्या शिवसेनेने आपले पाय येथे घट्ट रोवण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात आपला जनसंपर्क वाढवला. याच पाठबळाच्या जोरावर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना लक्षवेधी यश पदरात पडले. मागील ९ वर्षात शिवसेनेने काँग्रेसविरोधी वातावरणाचा फायदा उठवत गतवैभवाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शिवसेनेच्या वैभव नाईक यांचा वाटा मोठा आहे. नाईक यांनी ‘सदैव तुमच्या सोबत’ असा विश्वास देत गावागावात कार्यकर्त्यांचे जाळे विणले. शिवसेनेचे नामोनिशाणही संपलेल्या कित्येक गावात शिवसेनेच्या शाखा पुन्हा दिसू लागल्या. तालुक्यात आपले अस्तित्व टिकवताना शिवसेनेने देवबाग जिल्हा परिषद मतदारसंघात आपली मोठी ताकद निर्माण केली. आमडोस, चौके, घुमडे या गावात काँग्रेसचे थोडेफार प्राबल्य सोडले तर संपूर्ण देवबाग विभाग शिवसेनेने आपल्या झेंड्याखाली आणला आहे. आचरा विभागातही गाऊडवाडी, पिरावाडी, हिर्लेवाडी सोडून सर्वच गावात शिवसेनेने मुसंडी मारली. पेंडूर विभाग शिवसेनेने भगव्याखाली आणला. येथे वराड, भंडारवाडा, पेंडूर, मोगरणे हे गाव अजूनही काँग्रेसच्या ताब्यात आहेत. पोईप विभागात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेथील मसदे, चुनवरे, डिकवल, वायंगवडे, माळगाव ही गावे काँग्रेसजवळ आहेत तर गोळवण, पोईप या काँग्रेसच्या अधिपत्याखालील गावांमध्ये सेनेने चांगले यश मिळविले. सिंधुदूर्ग जिल्ह्यात मसुरे विभागातही डांगमोडे, वेरळ, मालोंड, बिळवस, सर्जेकोट ही गावे सोडली, तर अन्य गावात शिवसेना चांगली रुजत आहे. हिवाळे विभागात मात्र शिवसेनेला बरीच मेहनत करावी लागेल. येथील बहुतांश गावे काँग्रेसच्या ताब्यात आहेत. निरोम, कुडोपी, पळसंब, बांदिवडे बुद्रुक या गावात सेनेने प्रवेश केला आहे. शहरातील नगरपालिका विभागातही काँग्रेसला तोडीस तोड आव्हान शिवसेना निर्माण करू शकते.मालवण तालुक्यात होणारी निवडणूक नारायण राणे विरूद्ध शिवसेना अशीच असणार आहे. राणेंजवळ या निवडणुकीत प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी आहे. यामुळे ते येथे प्रचारात कमी ठेवणार नाहीत. मागील लोकसभा निवडणुकीत मालवणने शिवसेनेला साथ दिली तरीही एकतर्फी निवडणूक जिंकण्याची ताकद राणेंमध्ये आहे. यामुळे मालवणमधील जनादेश कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर मालवण तालुक्याने शिवसेनेचे विनायक राऊत यांना ८१८५ एवढे अनपेक्षित मताधिक्य मिळवून दिले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा जनतेत कमी झालेला आदर व त्यांचा अति आत्मविश्वास असे या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले. तालुक्यातील हिवाळे जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली ७८५ मतांची किरकोळ आघाडीवगळता काँग्रेस सर्वच विभागात पिछाडीवर गेली. नगरपालिका विभागातही काँग्रेस १९४२ मतांनी मागे आहे.