फिट इंडियामध्ये राज्याचा शालेय शिक्षण विभाग अनफिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:05 AM2021-07-24T04:05:51+5:302021-07-24T04:05:51+5:30

नोंदणी केलेल्या ८६ हजारांमधील केवळ ८ हजार ८०० शाळांना प्रमाणपत्र लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्रीय मंत्रालयाच्या संकल्पनेतून फिट ...

The state's school education department is unfit in Fit India | फिट इंडियामध्ये राज्याचा शालेय शिक्षण विभाग अनफिट

फिट इंडियामध्ये राज्याचा शालेय शिक्षण विभाग अनफिट

googlenewsNext

नोंदणी केलेल्या ८६ हजारांमधील केवळ ८ हजार ८०० शाळांना प्रमाणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्रीय मंत्रालयाच्या संकल्पनेतून फिट इंडिया चळवळीअंतर्गत फिट इंडियाच्या पोर्टलवर राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘खेलो इंडिया’ हा उपक्रप राबवला जातो. यामध्ये महाराष्ट्रातील १ लाखाहून अधिक शाळांपैकी ८६ हजार शाळांनीच नोंदणी केली आहे, तर त्यातील केवळ ८ हजार ८०० शाळांनाच ३ स्टार, ५ स्टारचे प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फिट इंडियामध्ये राज्याचा शालेय शिक्षण विभाग अनफिट झाल्याची टीका शालेय शिक्षण विभागावर शिक्षक संघटना करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांची शारीरिक तंदुरुस्तीही महत्त्वाची आहे. पण, शालेय शिक्षण विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. ज्या शाळांनी अजूनही नोंदणी केलेली नसून प्रमाणपत्र मिळविलेले नाही त्यांची नोंदणी करण्याचे आदेश गुरुवारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील सर्व शाळांचे फिट इंडिया ३ स्टार व ५ स्टारमध्ये वर्गीकरण करण्याकरिता पोर्टलवर जाऊन नोंदणीची प्रक्रिया शाळांनी पूर्ण करायची असते. यामध्ये असलेल्या प्रश्नावलीमध्ये शारीरिक शिक्षण विषय, शिक्षक संख्या, शाळेला असलेल्या क्रीडांगणाची संख्या, क्रीडांगणाचा आकार, शाळेपासून क्रीडांगणाचे अंतर, क्रीडांगणाचा फोटो, शारीरिक शिक्षण विषय तासिका संख्या, शारीरिक शिक्षण विषयाच्या दैनदिन ॲक्टिव्हिटी इत्यादी माहितीची नोंद करावी लागते, त्यानंतर शाळेचे प्रमाणपत्र तयार होते. राज्यामध्ये १ लाखाहून अधिक शाळा असून केवळ ८ हजार ८०० शाळांनाच प्रमाणपत्र मिळाले असून, हे शालेय शिक्षण विभागाचे अपयश असल्याचे अनिल बोरनारे म्हणाले.

Web Title: The state's school education department is unfit in Fit India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.