राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:06 AM2021-05-20T04:06:15+5:302021-05-20T04:06:15+5:30
दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ...
दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या.
कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बियाणे धोरणाबाबत राज्यस्तरीय बैठक मंत्रालयात झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नायक, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक शरद गडाख उपस्थित होते.
कृषिमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर बीजोत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला सध्या सोयाबिन, कापूस, आदी पिकांचे बियाणे परराज्यांतून आणावे लागत आहेत. राज्यातील बियाणे उद्योगाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक पिकातील बियाण्यांची गरज लक्षात घेत बियाणे साखळी विकसित करायला हवी. यामध्ये मूलभूत बीजोत्पादनाचे काटेकोर नियोजन करावे. ज्या कृषी विद्यापीठाने पीकनिहाय वाण विकसित केला आहे ते बियाणे कृषी विद्यापीठाने मागणीप्रमाणे उपलब्ध होण्यासाठी नियाेजन करावे. याबाबत सर्वस्वी जबाबदारी त्या संबंधित कृषी विद्यापीठाची राहील, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र हे पैदासकार बियाण्याच्या उत्पादनासाठी प्राधान्याने वापरावे. कृषी विभागाकडील तालुका बीजगुणन केंद्र, फळ रोपवाटिका यांचाही महाबीजने पुढाकार घेऊन बीजोत्पादनासाठी वापर करण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या. तसेच राज्यात सीड हब उभारणीसाठी येणाऱ्या अडचणी, जागेची उपलब्धता, बीजपरीक्षण प्रयोगशाळा उभारणी, सामूहिक प्रक्रिया व बियाणे पॅकिंग केंद्र याबाबतचा आढावा घेतला. पश्चिम महाराष्ट्रात सोयाबिन पिकाची उत्पादकता जास्त असून महाबीजने येत्या खरीप हंगामात विदर्भ व मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही बीजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करावे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
........................................