मुंबई : मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात अवकाळी पावसाचा मारा सुरु असतानाच आता २९, ३० आणि ३१ मार्च रोजी संपुर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. शिवाय पुढील ४८ तासांसाठी मुंबईतील हवामान ढगाळ राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरात झालेले वातावरणीय बदल, पृष्ठभागावरील तापमानात वाढ झाल्याने कमाल तापमानात झालेली वाढ आणि हवेतील आर्द्रतेमधील चढ-उतार; या घटकांमुळे राज्याच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत. परिणामी हवामान खात्याकडून अवकाळी पावसासह गारांचा इशारा देण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून सातत्याने कोकणात अवकाळी पावसाचा मारा सुरु असून, राज्यातही ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील चोविस तासांत राज्यात हवामान कोरडे होते. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. (प्रतिनिधी)
तीन दिवसांसाठी राज्याला अवकाळी पावसाचा इशारा!
By admin | Published: March 29, 2015 12:05 AM