मुंबई : लॉकडाऊनमुळे एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. एसटीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मे महिन्याचे ५० टक्केच वेतन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात यावे, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी राज्यव्यापी एसटी बचाव-कामगार बचाव आंदोलन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेद्वारे करण्यात आले. बुधवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून आंदोलन करण्यात आले.
एसटी महामंडळास कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुत करण्याच्या हेतुने १ हजार कोटी रुपये अनुदान देण्यात यावे. मे महिन्याचा उर्वरीत ५० टक्के वेतन तात्काळ देण्यात यावे. जुन महिन्याचे वेतन निश्चित असलेल्या तारखेस देण्यात यावे. एसटी कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.