राज्यभर चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 06:13 AM2017-08-15T06:13:30+5:302017-08-15T06:13:33+5:30

शेतकरी संपानंतर सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीने समाधान न झाल्याने सरसकट कर्जमाफीसाठी सोमवारी बळीराजा पुन्हा रस्त्यावर उतरला.

Statewide flyover | राज्यभर चक्का जाम

राज्यभर चक्का जाम

Next

मुंबई : शेतकरी संपानंतर सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीने समाधान न झाल्याने सरसकट कर्जमाफीसाठी सोमवारी बळीराजा पुन्हा रस्त्यावर उतरला. सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत सुकाणू समितीच्या नेतृत्वात राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशाराही समितीने दिला आहे.
नाशिकला संतप्त शेतकºयांनी वाहने अडविल्याने वाहतूक ठप्प झाली होती. खान्देशात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. अहमदनगर जिल्ह्यात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलन झाले. सुकाणू समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी अकोले येथील आंदोलनाचे नेतृत्व केले.
विदर्भातही आंदोलनाचा जोर होता. नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलन झाले. बुलडाणा जिल्ह्यातील टेंभूर्णा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टींनी यांनी चक्का जामचे नेतृत्व केले.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतकºयांनी रास्ता रोको केला. परभणीत आंदोलकांनी ९ बसेसवर दगडफेक केली. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
>शेतकºयांना न्याय न देणारे मोदी खोटारडे
शेतकºयांना उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणारा हमीभाव देण्यात येईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत दिले होते. मात्र आता शेतकºयांना हमीभाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे पंतप्रधान मोदी हे खोटारटे आहेत. अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या माध्यमातून देशातील १६० शेतकरी संघटना न्यायासाठी एकत्र येणार आहेत.
- खा. राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
>शेतकºयांच्या हस्ते आज ध्वजारोहण? : सुकाणू समितीचे कार्यकर्ते मंगळवारी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांना भेटणार आहेत. पालकमंत्र्यांऐवजी शेतकºयांच्या हस्ते ध्वजारोहण करू देण्याबाबत ते विनंती करणार असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले.
>सरकारने शेतकरी असंतोषाची दखल घ्यावी. निवृत्ती वेतन, सरसकट कर्जमाफी, हमीभावाचा निर्णय घ्यावा. उद्रेक होऊनही सरकार सकारात्मक भूमिका घेणार नसेल, तर सुकाणू समितीपुढे आणखी मोठे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- डॉ. अजित नवले,
राज्य समन्वयक,
शेतकरी सुकाणू समिती

Web Title: Statewide flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.