मुंबई : मुंबई आणि ठाण्यासह लगतच्या जिल्ह्यांना मंगळवारी तडाखा दिलेल्या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव बुधवारीदेखील कायम राहणार आहे. मंगळवारी मुंबईत कमाल तापमानाची नोंद ३७.५ अंश एवढी झाली असून, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, १६ मार्च रोजी कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. आणि त्यानंतर १७ ते १९ मार्च दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
गुजरातमधील जामनगर, जुनागड, राजकोट जिल्हे व महाराष्ट्रातील ठाणे, मुंबईसहित कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमानात पुढील २ दिवस म्हणजे १७ मार्चपर्यंत सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशांनी वाढ होईल. कमाल तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशांपर्यंत वाढून उष्णतेची लाटसदृश स्थिती जाणवू शकते. विदर्भसहित उर्वरित महाराष्ट्रात मात्र दुपारचे तापमान सरासरी इतके किंवा फार झाले तर १-२ अंशांनी वाढेल. १८ मार्चपासून पुन्हा तापमान कमी होऊन पारा २ ते ३ अंशांने खाली येऊ शकतो. त्या दरम्यान फक्त कोकणातच ढगाळ वातावरण राहू शकते. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
तापलेली शहरेअहमदनगर ३९.५ । परभणी ३९.४ । सोलापूर ३९.३मालेगाव ३८.८ । सांगली ३८.३ । कोल्हापूर ३८.१उस्मानाबाद ३८.१ । मुंबई ३७.५ । पुणे ३७.५ नांदेड ३७.२ । नाशिक ३७.१ । बारामती ३७.१ रत्नागिरी ३६.८ । सातारा ३६.७ । माथेरान ३६.४