Join us

अंगणवाडी सेविकांचे राज्यव्यापी आंदोलन

By admin | Published: July 03, 2015 1:52 AM

चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने संतप्त अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अखिल भारतीय मागणी दिवसाचे निमित्त साधत अंगणवाडी

मुंबई : चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने संतप्त अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अखिल भारतीय मागणी दिवसाचे निमित्त साधत अंगणवाडी कर्मचारी संघटनेने भ्रष्टाचार निर्मूलन, मानधनवाढ, पेन्शन, वेळेवर मानधन आणि अन्य मागण्यांसाठी ६ जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. पुणे जिल्ह्यापासून आंदोलनाची सुरुवात होणार असून संघटनेने ६ जुलैला दुपारी १२ वाजता पुणे जिल्हा परिषदेवर धडक मोर्चाची हाक दिली आहे. तर ७ जुलैला दुपारी २ वाजता आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका धडकणार आहेत. त्यानंतर १० जुलैला दुपारी १ वाजता संघटनेने सातारा जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करण्याचे ठरविले आहे.आघाडी सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात २०१४ साली केलेली वाढ अद्याप मिळाली नसल्याची माहिती राज्य महासचिव शुभा शमीम यांनी दिली. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारकडून अपेक्षित निधी मिळाला नसून राज्य सरकारने वाढीव मानधनाची आर्थिक तरतूद केलेली नाही. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले आहे. काही सेविकांना फेब्रुवारी, तर काहींना एप्रिलनंतर मानधन मिळालेले नाही. १२ जून रोजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत अंगणवाडी कृती समितीची बैठक झाली होती. त्यात अर्थ खात्याला मानधनवाढीचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती मुंडे यांनी दिली होती. मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने आक्रमक पवित्रा घ्यावा लागत आहे. (प्रतिनिधी)