गौतम हिरण यांच्या हत्येच्या निषेधार्थ जैन फेडरेशनची राज्यभर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:58 AM2021-03-11T04:58:57+5:302021-03-11T04:59:22+5:30
एसआयटी गठीत करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथील स्वातंत्र्य सैनिक झुंबरलाल हिरण यांचे सुपूत्र व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण होऊन निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघ यांच्या वतीने व विविध व्यापारी संघटनांच्या वतीने बुधवारी राज्यभर निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, नागपुर, सांगली, सातारा, अमरावती, अकोला या प्रमुख ठीकाणांसह राज्यात विविध ११० झालेल्या झालेल्या निदर्शनांमध्ये जैन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्थानिक स्तरावर प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी कोल्हापूर येथील आंदोलनात सहभागी झाले व शिष्टमंडळासह जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
राज्यात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात प्रदेश अध्यक्ष सुनिल चोपडा, स्वप्नील शहा, डॉ. मनोज छाजेड, डॉ. रीचा जैन, गिरीश पारेख, महावीर भन्साली, विनोद बोकडीया, सुनिल वर्मा या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध व्यापारी संघटनांचे प्रमुख व जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
याप्रकरणी दोषींवर एक आठवड्यात कारवाई न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती संपूर्ण देशभर वाढविण्यात येईल असा ईशाराही ललित गांधी यांनी दिला.
सखोल तपास करा
गौतम हिरण यांच्या खुन्यांना तात्काळ अटक करून सखोल तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करावी, अशी मागणी निवेदनात केली. अल्पसंख्यांक महासंघाच्या सल्लागार समितीचे प्रमुख अखिल भारतीय जैन समाजाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली असून त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली आहे.