मुंबई : मुंबई : केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या अबुसुफान कुरेशी या साडेतीन वर्षाच्या मुलाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. तिच्या नातेवाईकांनी ड्युटीवर असलेल्या तिघा निवासी डॉक्टरांना मारहाण केली. या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्लेखोरांवर केवळ जुजबी कारवाई करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील ३५० निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. हल्लेखोरांना अटक केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मार्डनने दिला आहे. या संपासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी केईएम रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, महापौर स्नेहल आंबेकर, स्थानिक नगरसेवक, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आणि मार्डचे पदाधिकारी यांची शिष्टमंडळाबरोबर बैठक झाली. मात्र सुमारे दोन तास चालेल्या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. तावडे व महापौरांनी सुरक्षेसंदर्भातल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले तरीही आंदोलकांनी संप मागे घेण्यास नकार दिला. याबाबत ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मारहाण केलेल्यांपैकी दोघांना पोलिसांनी पकडले होते. पण, जामीनावर सोडण्यात आले, तर इतर दोघे फरार आहेत. या चौघांवर कठोर कारवाई करावी, नायर आणि सायन रुग्णालयाचे सुरक्षा अहवाल तयार करावा, या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही आणि तो राज्यव्यापी केला जाईल. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतच्या मागण्यांबाबत आम्ही कृती आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही कालावधी लागेल. डॉक्टर, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यामक, वैद्यकीय अधिकारी सर्व कामावर होते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झालेली नाही. दोनतृतीयांश काम झालेले आहे. - डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
राज्यव्यापी संपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2015 5:41 AM