लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेल्वेकडून स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेवरील स्थानकांची साफसफाईची कामे चालू ठेवण्यात आली आहेत. यामध्ये ज्यात श्रमदान उपक्रमांसह स्थानकांची सखोल साफसफाई आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
मुंबई विभागात मुसळधार पाऊस असूनही स्वच्छ स्टेशन उपक्रम राबवले गेले. संपूर्ण प्लॅटफॉर्म परिसर आणि बुकिंग कार्यालयाचे प्रवेशद्वार स्वच्छ झाल्यानंतर मुलुंड स्थानकाचे रुपडे पालटले. मुलुंड स्थानकातील बाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शीव, कळवा, कर्जत, कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असेच उपक्रम राबविण्यात आले. कल्याण स्थानकातील प्रवासी प्रतीक्षालय, प्लॅटफॉर्म आणि एफओबीच्या संपूर्ण स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
पुणे विभागात मिरज, किर्लोस्करवाडी आणि सातारा स्थानकांच्या बाहेरील परिसराची स्वच्छता आणि त्यानंतर बुकिंग कार्यालयांची स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात आली. नंतर प्रवासी प्रतीक्षा कक्ष आणि स्वच्छतागृहांची सखोल साफसफाई झाली. पुणे स्टेशनवर सुका आणि ओला कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी लेबल लावण्यात आले. फूट ओव्हर ब्रिजवर थुंकीचे डाग आणि प्लॅटफॉर्मवरील बसण्याची जागा पूर्णपणे स्वच्छ केली गेली.
नागपूर विभागाने स्टेशन कर्मचारी आणि मुख्य आरोग्य निरीक्षकांच्या सहभागाने स्वच्छता उपक्रम आयोजित केले. सफाई कर्मचाऱ्यांनी अजनी स्टेशनचा संपूर्ण प्लॅटफॉर्म परिसर स्वच्छ केला. नागपूर विभागातील सर्व स्थानकांवर स्थानक प्रमुखांनी सुका आणि ओला कचरा वेगळा केला. तसेच सोलापूर विभागात सर्व प्रमुख स्थानकांवर सखोल स्वच्छता करण्यात आली. कोपरगाव स्टेशनचे सफाई कर्मचारी सर्वच प्लॅटफॉर्मच्या संपूर्ण प्लॅटफॉर्म स्वच्छतेमध्ये गुंतले आहेत.
भुसावळ विभागामध्ये झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, भुसावळ यांनी झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आसपासच्या परिसरातील जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापक अधिकारी, प्रशिक्षक आणि सुमारे ८० प्रशिक्षणार्थींनी स्वच्छता रॅली आयोजित केली. देवळाली येथे कर्मचाऱ्यांनी तपोवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांना पर्यावरणावरील प्लास्टिकच्या धोक्यांविषयी प्रबोधन करण्यासाठी कागदी पिशव्यांचे वाटप केले. भुसावळ येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या रस्त्यावर कचरा साफसफाईचे कामही हाती घेण्यात आले.